IPL 2025 च्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट, केव्हापासून सुरुवात होणार?
IPL 2025 Rest Matches Schedule : भारत पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या स्थितीतमुळे सुरक्षेच्या दृष्टीने आयपीएलचा 18 वा मोसम एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र आता परिस्थिती पाहता पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार रंगणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) उर्वरित 16 सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे 9 मे रोजी आयपीएलचा 18 वा हंगाम एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर परिस्थिती पाहता येत्या काही दिवसात पुन्हा या स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या शुक्रवार-शनिवारपर्यंत पुन्हा एकदा थार रंगणार आहे. याबाबत सध्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. तसेच आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल फ्रँचायजींसह संपर्कात आहेत.
अंतिम सामना केव्हा?
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय 30 मे रोजी आयपीएल 2025 मधील अंतिम सामन्याचं आयोजन करु शकते. याआधी नियोजित वेळापत्रकानुसार 25 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वरित 16 सामन्यांचं आयोजन हे 3 शहरांमध्ये केलं जाऊ शकतं. त्यानुसार, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबाद या शहरात सामने खेळवण्यात येऊ शकतात. तसेच विशाखापट्टणमचं नावही आघाडीवर आहे. या 18 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याला 16 मे पासून सुरुवात होऊ शकते. तसेच उर्वरित 15 दिवसांमध्ये सामने पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयकडून डबल हेडरच्या आयोजनावर भर दिला जाऊ शकतो. प्लेऑफ आणि फायनलसाठी बीसीसीआयला 6 दिवस हवेत. त्यामुळे 11 मे रोजी बीसीसीआयकडून फ्रँचायजींना सुधारित वेळापत्रक पाठवण्यात येऊ शकतं.
सर्व विदेशी खेळाडू मायदेशी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने सर्व फ्रँचायजींना 13 मे पर्यंत आपल्या खेळाडूंना एकत्र करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांना आता परत बोलावून घ्या, असं बीसीसीआयने फ्रँचायजींना सांगितलं आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावानंतर आयपीएलचा 18 वा मोसम आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला. त्यामुळे अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले होते. मात्र आता काही खेळाडू पुन्हा या उर्वरित सामन्यांसाठी परत येण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र फ्रँचायजीकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहे.
पंजाब विरुद्ध दिल्ली सामना पुन्हा होणार?
दरम्यान आयपीएल 2025 हंगाम 9 मे रोजी स्थगित करण्यात आला. त्याआधी गुरुवारी 8 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने होते. हा सामना धरमशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र या सामन्यादरम्यान पठाणकोट आणि आजूबाजूच्या परिसरात ड्रोन हल्ले सुरु होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे आता हा सामना पुन्हा केला जाणार की रद्द होणार? याचीही उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.