SRH vs MI: टॉस होताच दहशतवादी हल्ल्यावर पॅट कमिन्स आणि हार्दिक पांड्याने केलं विधान, म्हणाले…
आयपीएल 2025 स्पर्धेतील 41वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण यावेळी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजयानंतर प्लेऑफचं शर्यतीचं चित्र बदलणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेकीचा कौल झाला आणि मुंबई इंडियन्सने जिंकला. हार्दिक पांड्याने काय घेणार? हे सांगण्यापूर्वीच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. हार्दिक पांड्या म्हणाला की’सर्वप्रथम मी दहशतवादी हल्ल्यातील मृतांबद्दल शोक व्यक्त करतो. आम्ही एक संघ म्हणून आणि एक फ्रँचायझी म्हणून अशा कोणत्याही हल्ल्यांचा निषेध करतो.’ असं सांगितल्यानंतर हार्दिक पांड्याने काय निवडणार त्याबाबत भाष्य केलं. ‘आम्ही आज रात्री प्रथम गोलंदाजी करू. हा ट्रॅक चांगला दिसतोय, आमच्या संघात फक्त एक बदल आहे. अश्विनीची जागा विघ्नेशने घेतली आहे. आपल्याला फक्त आपल्या योजना अंमलात आणाव्या लागतील आणि खेळ शक्य तितका सोपा करायचा असेल, योग्य नियोजन करावे लागेल.’
हार्दिक पांड्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘हे आमच्यासाठी खूप दुःखद आहे, आमच्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.’ संघात एक बदल केल्याचं त्याने सांगितलं. संघात जयदेव उनाडकटला घेतलं आहे. तर मोहम्मद शमी हा इम्पॅक्ट प्लेयर असणार आहे. या सामन्यात डीजे, चीअर्सलीडर्स आणि फटक्यांची आतषबाजी असं काहीच होणार नाही. तर हाताला काळ्या पट्ट्या बांधून सर्व खेळाडू आणि पंच मैदानात उतरले आहेत.
🚨 Toss 🚨 @mipaltan elected to field against @SunRisers. #MI captain Hardik Pandya and #SRH captain Pat Cummins condemn the gruesome Pahalgam terror attack and pay homage to the victims. #TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/qfgPeWpmIF
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2025
जम्मू काश्मीरमध्ये 22 एप्रिलला झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांचा नांग्या ठेचण्याची मागणी होत आहे. असं असताना उच्च पातळीवर जोर बैठका सुरु झाल्या आहेत. येत्या काही दिवसात मोठं काही तरी होणार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.
