14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खेळावर प्रश्नचिन्ह, इतका मोठा आरोप लावण्याचं कारण काय?
आयपीएल 2025 स्पर्धेत 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी सर्वात चर्चेचा विषय ठरला. त्याने आतापर्यंत खेळलेल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही वैभवने 15 चेंडूत 40 धावांची खेळी केली. यानंतर त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. का आणि कशासाठी ते जाणून घ्या

वैभव सूर्यवंशीने अवघ्या 14व्या वर्षीच क्रिकेटविश्वात नावलौकिक मिळवला आहे. आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात 35 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा होणार नाही तर काय होणार आहे. डावखुऱ्या वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने 15 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्याच्या आक्रमक खेळीनंतरही त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वैभव सूर्यवंशी खेळाडू नसल्याची टीकाही होत आहे. सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशीविरोधात एक गट सक्रिय झाला आहे. या गटाने वैभव सूर्यवंशीवर नको ते आरोप केले आहे. वैभव सूर्यवंशीने पंजाब किंग्सविरुद्ध 15 चेंडूत 40 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. म्हणजेच त्याने एकही धाव घेतली नाही. 40 धावा त्याने षटकार आणि चौकाराने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका युजर्सने लिहिलं की, ‘वैभव हा खेळाडू नाही, तो एक फ्रॉड आहे. तो प्रत्येक चेंडूवर फक्त बॅट फिरवतो.’ सोशल मीडियावरील या गटाच्या मते क्रिकेटमध्ये सिंगल आणि डबल धावांचही महत्त्व आहे. वैभव सूर्यवंशी फक्त चौकार आणि षटकारांवरच अवलंबून असल्याचं त्यांनी आरोप केला आहे. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात 32हून अधिक सरासरीने 195 धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने 20 षटकार आणि 14 चौकार मारले आहेत. म्हणजेच 166 धावा फक्त चौकार-षटकारांनी केल्या आहेत. यावरून वैभव सूर्यवंशीला स्ट्राईक रोटेशनवर विश्वास नसल्याचं दिसत आहे. त्याचं अशा पद्धतीने खेळणं अनेकांना रुचलेलं नाही.
दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी हा फक्त 14 वर्षांचा आहे. त्याच्या आरोप करण्यापूर्वी त्याचं वय लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिली आयपीएल स्पर्धा आहे. राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटने त्याला पाठिंबा दिला आहे. राजस्थान रॉयल्सला त्याच्या खेळीवर काहीच आक्षेप नाही. कारण वैभव पुढे जाऊन आपला खेळ आणखी सुधारेल यात काही शंका नाही. पण स्ट्राईक रोटेशनचं गणित त्याला उमगलं तर त्याच्यापेक्षा घातक फलंदाज कोणी नसेल, हे देखील तितकंच खरं आहे.