PBKS vs RR : मार्कस स्टोयनिसचा तडाखा, राजस्थानसमोर 223 रन्सचं टार्गेट, पंजाब रोखणार?

Punjab Kings vs Rajasthan Royals, 1st Innings Highlights : मार्कस स्टॉयनिस याने शेवटच्या टप्प्यात वादळी खेळी करुन पंजाबला 222 धावांपर्यंत पोहचवलं. त्यामुळे आता राजस्थानला जिंकायचं असेल तर 11.15 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

PBKS vs RR : मार्कस स्टोयनिसचा तडाखा, राजस्थानसमोर 223 रन्सचं टार्गेट, पंजाब रोखणार?
Marcus Stoinis and Suryansh Shedge PBKS vs RR IPL 2026
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 28, 2026 | 10:01 PM

मार्कस स्टोयनिस याने अखेरच्या टप्प्यात केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्सने न्यू चंडीगडमध्ये 200 पार मजल मारली आहे. पंजाबने आयपीएल 2026 स्पर्धेच्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. पंजाबची 2025 पासून 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही एकूण 13 वी वेळ ठरली. पंजाबसाठी ओपनर प्रभसिमरन सिंह आणि स्टोयनिस या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी शानदार बॅटिंग केली. त्यामुळे आता राजस्थान 223 धावा करत सहावा सामना जिंकणार की पंजाब विजयी घोडदौड कायम राखत आणखी 2 गुण मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या डावात काय झालं?

राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबसाठी पहिल्या 5 फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग केली. प्रियांश आर्या याने 11 बॉलमध्ये 29 धावा केल्या. प्रियांशने या दरम्यान 1 षटकार आणि 5 चौकार लगावले. कूपर कोनोली आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी प्रत्येकी 30-30 धावा केल्या.

ओपनर प्रभसिमरन याने 44 बॉलमध्ये 59 रन्स केल्या. प्रभने या दरम्यान 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर अखेरच्या क्षणी मार्कस स्टोयनिस याने सूर्यांश शेडगे याच्यासोबत धमाका केला. या दोघांनी शेवटच्या 12 चेंडूत 41 रन्सची पार्टनरशीप केली. तसेच स्टॉयनिसने शेवटच्या 6 चेंडूत 24 धावा चोपल्या. त्यामुळे पंजाबला 200 पार पोहचता आलं.

मार्कस स्टॉयनिसचा अर्धशतकी झंझावात

स्टॉयनिसने त्याच्या कारकीर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. स्टॉयनिसने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. स्टॉयनिसने 22 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 62 रन्स केल्या. तर सूर्यांश शेडगे याने 3 धावा जोडल्या. तर राजस्थानसाठी यश राज पुंजा याने 2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

स्कोअरकार्ड


दरम्यान पंजाब 19 व्या मोसमातील 39 व्या सामन्यापर्यंत अजिंक्य असणारी एकमेव टीम आहे. पंजाबने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर पंजाबचा 1 सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे पंजाबकडे 13 गुण आहेत. पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर राजस्थानने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थान सहावा सामना जिंकत सुस्साट सुटलेल्या ‘पंजाब मेल’ला ब्रेक लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us