Video : पाकिस्तान सुपर लीगमध्ये आयपीएलच्या नावाचा गवगवा, पुरस्कार सोहळ्यात मोठी चूक
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने सुपर लीग स्पर्धा सुरु केली आहे. यंदा आयपीएल स्पर्धेसोबत वेळापत्रक जारी केलं आहे. असं असताना पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या डोक्यातून आयपीएलचं भूत काही जाताना दिसत नाही. याची प्रचिती पीएसएलच्या 12 व्या सामन्यातील पुरस्कार सोहळ्यात दिसली.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. मिळणारी बक्षीसं असो की केलेल्या घोडचुका, यामुळे सोशल मीडियावर रोज हासं होत आहे. ट्रोलर्सही सोशल मीडियावर पाकिस्तानला ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या 12व्या सामन्यात असंच काहीसं झालं. या सामन्यात मुलतान सुल्तान्सने लाहोर कलंदर्सचा 33 धावांनी पराभव केला. पण या विजयापेक्षाही सामन्यातील चुकांबद्दल जास्त चर्चा होत आहे. पहिलं तर या सामन्यात मुल्तानच्या गोलंदाजाने विकेट घेतल्याच्या सेलिब्रेशन दरम्यान त्याचाच संघातील सहकारी उस्मान खानला दुखापत केली. त्यानंतर पुरस्कार सोहळ्यात पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि समालोचक रमीझ राजा यांनी पीएसएलला आयपीएल म्हटले.
सामन्यानंतरच्या सादरीकरणात सामन्यातील सर्वोत्तम झेलचा पुरस्कार सादर केला गेला. यावेळी रमीझ राजा यांनी चुकून पीएसएलऐवजी स्पर्धेचा उल्लेख एचबीएल आयपीएल असा केला. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पीएसएलमध्ये आयर्लंडचा खेळाडू जोशुआ लिटिल मुल्तान सुल्तान्सकडून खेळत आहे. यावेळी त्याने सामन्यात लाहोर कलंदर्सचा फलंदाज फखर जमाचा एक जबरदस्त झेल पकडला. यासाठी त्याला सामन्यानंतर कॅच ऑफ द मॅच पुरस्कार दिला गेला. यावेळी ही चूक घडली. पण पुरस्कार दिल्यानंतरही रमीझ राजा चूक कळली नाही. तसेच त्यात काहीच सुधारणा केली नाही.
Catch of the ” HBL IPL ” Rambo at it again pic.twitter.com/8Ww8vtvQIt
— Zak (@Zakr1a) April 22, 2025
जोशुआ लिटिल हा 2023 आणि 2024 मध्ये आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. आयपीएल 2022 स्पर्धेत विजेत्या संघातही होता. पण त्याला तेव्हा खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने आयपीएल 2023 मध्ये पहिला सामना खेळला. पण यावेळी मेगा लिलावात जोशुआ लिटिल संघात घेण्यास कोणीही रस दाखवला नाही. त्यामुळे आता तो पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळत आहे.
26/11 च्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जात नाही. 2012-13 च्या मालिकेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेला नाही. आयपीएलचा पहिला हंगाम हा एकमेव हंगाम होता यात 11 पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेतला होता. यात शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदी यांचा समावेश होता. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना डावलण्यात आलं आहे.
