बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन, पुद्दुचेरीत क्रिकेटपटूंसोबत काय घडतंय?
पुद्दुचेरीच्या क्रिकेटपटूंचं करिअर संपुष्टात आणण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर बीसीसीआयला खडबडून जाग आली आहे. भरती गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन सचिन देवाजीत सैकिया यांनी दिलं आहे.

जगभरात सर्वाधिक क्रिकेट प्रेमी भारतात आढळतात. क्रिकेट म्हणजे जीव की प्राण.. क्रिकेटच्या चर्चांचे फड रंगतात.. इतकंच काय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून बीसीसीआयचा नावलौकीक आहे. तसेच इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात महागड्या लीगपैकी एक आहे. भारतीय क्रिकेटपटूंना एकदा देशांतर्गत, आयपीएल आणि मुख्य टीममधून खेळण्याची संधी मिळाली तर आयुष्य बदलून जातं. त्यामुळे देशातील तरूण रोज मैदानात घाम गाळत असतात. भविष्यातील विराट कोहली आणि रोहित शर्मा बनण्याची स्वप्न पाहात असतात. पण युवा खेळाडूंसोबत त्याच्या क्रिकेट कारकीर्द सुरु होण्याआधीच सुरूंग लावल्याचं दिसत आहे. हे प्रकरण पुद्दुचेरी क्रिकेटचं.. येथे खासगी अकादमीचे प्रशिक्षक राज्यातील खेळाडूंना बनावट कागदपत्रं देऊन स्थानिक क्रिकेटपटू बनवत असल्याचं समोर आलं आहे. यासाठी लाखो रुपये घेतलं जात असल्याचं सांगितलं जात आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतातील अनेक क्रिकेटपटू पुद्दुचेरीत येतात आणि पैशांच्या जोरावर दुसऱ्याच दिवशी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करतात. धक्कादायक म्हणजे 17 खेळाडूंचे आधार कार्ड पुद्दुचेरीतल मोतीलाल नगर येथील एकाच पत्त्यावर नोंदणीकृत झाल्याचं आढळून आलं आहे. सहा खेळाडू पुद्दुचेरीच्या वरिष्ठ संघाकडून खेळले आहेत. तर सात जण पोंडुचेरी प्रीमियर लीगमध्ये खेळले आहेत. यात प्रौढच नाही तर अल्पवयीन क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.
बीसीसीआयने 2018 मध्ये पुद्दुचेरीला पूर्ण सदस्य असल्याचा दर्जा दिला आणि तेव्हापासून हा खेळ सुरु झाल्याची चर्चा आहे. बीसीसीआयने पुद्दुचेरीला एक विशेष सूट दिली होती. त्यात नोकरी करणाऱ्या किंवा शिक्षण घेत असलेल्या खेळाडूंना ऑगस्ट 2018 पासून ताबडतोब नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली. क्रिकेट संघटनांच्या निषेधानंतर सप्टेंबर 2018 मध्ये ही सूट रद्द करण्यात आली. पण असं असूनही परराज्यातील क्रिकेटपटू पुद्दुचेरीमध्ये फसवणूक करून खेळले. या वर्षीच्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये, पुद्दुचेरी संघाने एकाही स्थानिक खेळाडूला खेळवलं नाही. गेल्या चार वर्षांत खेळल्या गेलेल्या 29 रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये पुद्दुचेरीमध्ये जन्मलेल्या फक्त पाच खेळाडूंचा सहभाग होता.
बाहेरील खेळाडू आणि बनावट कागदपत्रांचा समावेश असलेल्या या गैरप्रकारामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना मोठा फटका बसला आहे. बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन करून पुद्दुचेरीतील स्थानिक खेळाडूंची फसवणूक केली जात असल्याचं उघड झालं आहे. पुद्दुचेरीतील हा गैरप्रकार रोखण्यासाठी विदर्भ पॅटर्नचा अवलंब करण्याची मागणी जोर धरत आहे. विदर्भाकडून खेळण्यासाठी तीन वर्षांचे शिक्षण आणि क्रीडा रेकॉर्ड आवश्यक आहेत.बीसीसीआयने कठोर देखरेख, जीपीएस ट्रॅकिंग आणि ऑन-साईट पडताळणी प्रणाली लागू करावी, अशीही मागणी आहे. इतकंच काय या गैरप्रकारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणीही जोर धरत आहे.
