MS धोनी शाकाहारी की मांसाहारी? आवडता पदार्थ कोणता? जुन्या रूममेटने केला मोठा खुलासा
MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खाण्याच्या सवयींविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याच्या एका रूममेटने महत्वाची माहिती दिली आहे.

MS Dhoni Food Habit : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धोनीने 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र तो आयपीएलमध्ये नियमितपणे खेळत आहे. आजही त्याची लोकप्रियता कायम आहे, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. एमएस धोनीला नेहमी एकांत हवा असतो, तो इतर खेळाडूंप्रमाणे वैयक्तिक आयुष्यातील माहिती जास्त शेअर करत नाही. मात्र आता त्याच्या खाण्याच्या सवयींविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याचा जुना रूममेट आकाश चोप्राने धोनीबाबत माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आकाश चोप्रा आणि धोनी रूममेट
भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने एका कार्यक्रमात सांगितले की, आम्ही 2004 मध्ये रूममेट होतो. आम्ही भारत अ संघासोबत झिम्बाब्वे आणि केनियाच्या दौऱ्यावर जाणार होतो. मी त्यावेळी टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. आम्ही बेंगळुरूमधील कॅम्पसाठी एकत्र जमलो होतो. मी हॉटेलमध्ये आलो तेव्हा मला सांगण्यात आले की एमएस धोनी माझा रूममेट असेल. तो रांचीचा खेळाडू आहे हे ही मला माहिती नव्हते. त्या कॅम्पच्या काळात मी आणि धोनी सुमारे एक महिना रूममेट होतो.
MS धोनी शाकाहारी आहे की मांसाहारी?
लल्लनटॉपच्या मुलाखतीत आकाशने सांगितले की, ‘मी धोनीला विचारले की तो शाकाहारी आहे की मांसाहारी. कारण आम्हाला जेवण ऑर्डर करावे लागत असे. आम्ही दोघेही शाकाहारी असतो किंवा दोघेही मांसाहारी असतो तर गोष्टी आणखी सोप्या झाल्या असत्या. धोनीने मला विचारले की तू काय खातोस? मी शाकाहारी असं त्याला सांगितले. त्यानंतर धोनीने माझ्यासोबत 30 दिवस शाकाहारी अन्न खाल्ले. मला नंतर कळले की तो मांसाहारी आहे.
पुढे बोलताना आकाश चोप्राने म्हटले की ‘आम्ही रूम शेअर करत असताना त्याने कधीही रूम सर्व्हिसला फोन करून मासांहारी अन्न मागवले नाही. त्यावेळी धोनीचा स्वभाव लाजाळू होता असं म्हणता येईल. मात्र त्याच्याकडे चांगला आत्मविश्वास होता. धोनीला हे माहिती होते की, तो काय करत आहे आणि काय करायचे आहे.’ दरम्यान, एका मुलाखतीत धोनीने बटर चिकन हा पदार्थ आपल्या आवडीचा असल्याचे म्हटले होते.
