ENG vs IND : ना दुखापत, ना डच्चू, दुसऱ्या कसोटीतून मॅचविनर बॉलर बाहेर, कारण काय?
England vs India 2nd Test : भारतीय कसोटी संघाने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला. त्यामुळे शुबमनसेना 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताला मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजा कौटुंबिक कारणामुळे माघार घ्यावी लागली.

टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेत विजयाने सुरुवात केल्यानंतर यजमान इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लंडने टीम इंडियावर 24 जून रोजी पहिल्या सामन्यातील पाचव्या दिवशी 5 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून बर्मिंगहॅममध्ये खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी 2 दिवसांआधीच अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र या सामन्याआधी एका मॅचविनर खेळाडूला टीमपासून दूर व्हावं लागलं आहे.
दुसऱ्या सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार त्या खेळाडूला कौटुंबिक कारणामुळे संघापासून दूर व्हावं लागलं आहे. या खेळाडूचा दुसऱ्या कसोटीसाठी 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर टीमला या खेळाडूशिवाय नेट्स प्रॅक्टीसमध्ये उतरावं लागलं होतं. त्यानंतर आता त्या खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्येही संधी मिळाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कौटुंबिक कारणामुळे माघार
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुसऱ्या कसोटीआधी सरावासाठी टीमसह मैदानात आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जोफ्रा आर्चर याला कौटुंबिक कारणामुळे संघाची साथ सोडावी लागली. त्यामुळे जोफ्राची प्लेइंग ईलेव्हनमध्ये निवड करण्यात आली नाही.
इंग्लंडने 26 जून रोजी दुसऱ्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला होता. जोफ्रा आर्चर याला 4 वर्षांनी कसोटी संघात स्थान देण्यात आलं होतं. जोफ्रा आर्चर याने टीम इंडिया विरुद्धचा अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तसेच आता जोफ्रा दुसर्या कसोटीतून इंग्लंड संघात कमबॅक करणार असल्याचं निश्चित समजलं जात होतं. मात्र अखेरच्या क्षणी जोफ्राला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. त्यामुळे इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता पहिल्या कसोटीतील त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
इंग्लंड मालिकेत 2-0 ने आघाडी घेण्यासाठी सज्ज
England have revealed their playing XI for the second #ENGvIND Test at Edgbaston 👇https://t.co/vbGXPIHszm
— ICC (@ICC) June 30, 2025
जोफ्रा आर्चरची कसोटी कारकीर्द
दरम्यान जोफ्रा आर्चर याने इंग्लंडचं 13 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. जोफ्राने 13 सामन्यांमधील 24 डावांत 31.05 च्या सरासरीने एकूण 42 विकेट्स घेतल्या आहेत. जोफ्राने एकूण 3 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मात्र आता चाहत्यांना आणि स्वत:ला जोफ्राला कमबॅकसाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार, हे निश्चित झालं आहे.
