ते सर्व काही खोटं आहे, करूण नायरने त्या चर्चांवर केला मोठा खुलासा
भारत इंग्लंड कसोटी मालिका संपल्यानंतरही चर्चा काही संपत नाहीत. या मालिकेत करूण नायरची कामगिरी निराशाजनक राहिली. या दरम्यान त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावर करूण नायरने स्पष्टीकरण दिलं आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली. पाचही सामन्यात नाणेफेक गमवली असली तर संघाने अँडरसन तेंडुलकर मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यामुळे टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे. असं असताना या दौऱ्यात करूण नायर मात्र फेल गेला. आठ वर्षानंतर त्याला संघात स्थान मिळालं होतं. पण त्या संधीचं सोनं करण्यात अपयशी झाला. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात त्याला वगळण्यात आलं होतं. पण पाचव्या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि पहिल्या डावात अर्धशतक ठोकलं. तर दुसऱ्या डावात त्याला काही खास करता आलं नाही. त्यामुळे करूण नायरची क्रिकेट कारकीर्द संपली असं क्रीडारसिकांना वाटतं. असं असताना पाचवा कसोटी सामना सुरु असताना त्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल असं सांगण्यात येत होतं. आता त्या फोटोवर करूण नायरने मौन सोडलं आहे.
करूण नायरने सांगितलं की, स्टेडियममध्ये केएल राहुलसोबत बसल्याचा जो फोटो व्हायरल होत आहे, तो एआय जनरेटेड आहे. नायरने इनसाइडस्पोर्ट डॉट कॉमशी बोलताना सांगितलं की, ‘माझ्या मते तो एआयने बनवलेला व्हिडीओ होता. यात काही तथ्य नाही. हो, आम्ही बाल्कनीच बसलो होतो. पण जे काही नंतर झालं ते काही खरं नाही.’ करूण नायरच्या या स्पष्टीकरणानंतर क्रीडारसिकांना धक्का बसला आहे. कारण नव्या तंत्रज्ञानामुळे काहीही होऊ शकते. एखाद्याचा फोटो किंवा व्हिडीओ तयार त्याची बदनामी केली जाऊ शकते.
Karun Nair has opened up on a viral video of him allegedly breaking down in dressing room while being consoled by KL Rahul.#ENGvsIND #KarunNair #KLRahul #CricketTwitter pic.twitter.com/IvmtyokLoM
— InsideSport (@InsideSportIND) August 12, 2025
केएल राहुल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना करुण म्हणाला, “मला प्रसिद्ध आणि केएल राहुलसोबत राहून बरे वाटले. गेल्या दोन महिन्यांत आम्हाला खूप मजा आली. आम्ही एकत्र खूप वेळ घालवला. आम्ही क्रिकेटबद्दल बोललो. संघात परतण्याव्यतिरिक्त आम्ही इतर गोष्टींबद्दल खूप बोललो. आमचा वेळ चांगला गेला आणि मला आनंद आहे की मालिकाही चांगल्या पद्धतीने संपली,”
