पाकिस्तानी खेळाडूचा पारा चढला, चाहत्याला मारण्यासाठी घेतली धाव; पण… Watch Video
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पाकिस्तानला 3-0 ने मात मिळाली. या पराभवानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला. एका चाहत्याने यावेळी बोचरी टीका केली. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूला राग अनावर झाला आणि आक्रमक झाला. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

न्यूझीलंड संघाने पाकिस्तानला वनडे मालिकेतही पराभवाची धूळ चारली. टी20 मालिकेत 4-1 मात दिली होती. त्यानंतर वनडे मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश दिला आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मोहम्मद रिझवानने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पावसामुळे हा खेळ 42 षटकांचा झाला. न्यूझीलंडने 42 षटकात 8 गडी गमवून 264 धावा केल्या आणि विजयासाठी 265 धावा दिल्या. पण पाकिस्तानचा संपूर्ण संघ 221 धावांवर ऑलआऊट झाला. मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान एका पाकिस्तानी खेळाडूचा चाहत्यांसोबत वाद झाला. हे प्रकरण हाणामारीपर्यंत येऊन पोहोचलं. वादाची तीव्रता पाहून सुरक्षा रक्षकाने खेळाडूला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काही ऐकले नाही. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानी खेळाडू खुशदिल शाह हा शेवटच्या सामन्यानंतर चाहत्यासोबत वाद करताना दिसला. खरं तर पाकिस्तानची वारंवार हरण्याची स्थिती पाहून चाहत्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे त्याने पराभूत मानसिकतेत अडकलेल्या खेळाडूंबाबत काही टीका केल्या. त्यामुळे खुशदिल शाहचा संयम सुटला आणि सीमेरेषेजवळील रेलिंगवरून उडी मारली आणि चाहत्याकडे पोहोचला. यावेळी पाकिस्तान संघातील सहकारी आणि सुरक्षा कर्मचारी खुशदिल शाहला थांबवताना दिसले. पण खुसदिलचा राग इतका वाढला होता की तो ऐकायचं नाव घेत नव्हता.
A fan beating Pakistani cricketer Khushdil Shah in New Zealand. pic.twitter.com/pCnccxmZh0
— 𝐀𝐭𝐞𝐞𝐪 𝐀𝐛𝐛𝐚𝐬𝐢 (@AbbasiAteeq20) April 5, 2025
टी20 मालिकेतही खुशदिल शाह चर्चेत आला होता. त्याने एका सामन्यात फलंदाजी करताना न्यूझीलंडचा गोलंदाज फॉकेसला धक्का मारला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करत सामना फीमधून 50 टक्के रक्कम कापली होती. तसेच तीन डिमेरिट पॉइंट्स दिले होते. दुसरीकडे, पराभवानंतर कर्णधार मोहम्मद रिझवानने मत व्यक्त केलं. ‘आमच्यासाठी निराशाजनक मालिका. सकारात्मक बाब म्हणजे बाबरने दोन अर्धशतके ठोकली. नसीम शाहची फलंदाजीही चांगली. गोलंदाजीत सुफियान मुकीम हाच तो खेळाडू होता ज्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. मी सर्व विभागांमध्ये न्यूझीलंडला श्रेय देतो. ते चांगले खेळत आहेत.’, असं रिझवान म्हणाला.
