
आयपीएलच्या 18 व्या मोसमात लखनौ सुपर जायंट्सने आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 228 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनौ सुपर जायंट्सला 200 पार पोहचवण्यात कर्णधार ऋषभ पंत याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. पंतने आरसीबीसाठी करो या मरो असलेल्या या सामन्यात वादळी शतक झळकावलं. पंतने मैदानात चौफेर फटकेबाजी करत आरसीबीच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. पंतला या मोसमात धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र पंतने शेवटच्या सामन्यात शतक ठोकत सर्व हिशोब बरोबर केला आहे. तसेच पंतने या शतकासह महारेकॉर्ड ब्रेक केला आहे.
ऋषभ पंत याने 29 बॉलमध्ये या हंगामातील दुसरं तर एकूण 20 वं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पंतने पुढील 50 धावांसाठी आणखी 25 बॉलचा सामना केला. पंतने अशाप्रकारे 54 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. पंतने 185.19 च्या स्ट्राईक रेटने हे शतक झळकावलं. पंतने या शतकी खेळीत 6 षटकार आणि 10 चौकार लगावले. पंतचं हे आयपीएल कारकीर्दीतील दुसरं शतक ठरलं. तसेच पंतने या शतकासह हेन्रिक क्लासेन याचा महारेकॉर्ड ब्रेक केला. पंत आयपीएल इतिहासात शतक करणारा सर्वात महागडा फलंदाज ठरला. पंतने याबाबतीत हेन्रिक क्लासेनला मागे टाकलं.
क्लासेनने 25 मे रोजी अरुण जेटली स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 37 बॉलमध्ये शतक केलं होतं. सनरायजर्स हैदराबादने क्लासेनला 23 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. तर पंतला या हंगामासाठी लखनौने 27 कोटी रुपये खर्चून आपल्या गोटात घेतलं होतं. पंत यासह आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र पंतला या मोसमात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र पंतने जाता जाता शेवटच्या सामन्यात शतक ठोकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान पंतने आयपीएल कारकीर्दीत तब्बल 7 वर्षांनी शतकाची प्रतिक्षा संपवली. पंतने याआधी 2018 साली शतक केलं होतं. त्यानंतर आता पंतने शतक करत रोहित शर्माच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. रोहित शर्मा यानेही आयपीएलमध्ये 2 शतकं झळकावली आहेत.
पंतचं जबरदस्त सेलिब्रेशन
Special centurion with a special celebration 🥳
Rate this on a scale of 1️⃣ to 🔟 👇
Updates ▶ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB | @RishabhPant17 pic.twitter.com/d55Ez2rNcN
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
दरम्यान आरसीबीला टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. आरसीबीने हा सामना जिंकला तर ते दुसऱ्या स्थानी पोहचतील. तसेच आरसीबी क्वालिफायर 1 साठी पात्र ठरेल. त्यामुळे आरसीबीचा पंजाब विरुद्ध सामना होईल. इतकंच नाही, तर आरसीबीला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 1 अतिरिक्त संधीही मिळेल. मात्र त्यासाठी आरसीबीला लखनौ विरुद्ध विजय मिळवावा लागेल. त्यामुळे आता आरसीबी या 228 धावांचा डोंगर पार करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.