Mumbai Indians: ‘बुमराहला नडताना IPL चा नाही, आधी देशाचा विचार केला’, दक्षिण आफ्रिकेच्या पेस बॉलरचं कौतुक

जसप्रीत बुमराहसमोर (Jasprit Bumrah)माघार घेतली नाही, म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर अ‍ॅशवेल प्रिन्सने मार्को जॅनसेनचं कौतुक केलं आहे.

Mumbai Indians: 'बुमराहला नडताना IPL चा नाही, आधी देशाचा विचार केला', दक्षिण आफ्रिकेच्या पेस बॉलरचं कौतुक
Jasprit bumrah (IPL/Twitter)

डरबन: जसप्रीत बुमराहसमोर (Jasprit Bumrah)माघार घेतली नाही, म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर अ‍ॅशवेल प्रिन्सने मार्को जॅनसेनचं कौतुक केलं आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत जोहान्सबर्गच्या दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मार्को जॅनसेनमध्ये (Marco Jansen) मैदानावर जोरदार वादावादी झाली होती. आयपीएलमधल्या (IPL) संबंधांचा विचार न करताना त्याने देशाचा पहिला विचार केला, अशा शब्दात अ‍ॅशवेल प्रिन्सने जॅनसेनचे कौतुक केले.

मुंबई इंडियन्समध्ये दोघे एकत्र होते

आयपीएल 2021 मध्ये बुमराह आणि जॅनसेन दोघे मुंबई इंडियन्सच्या संघात एकत्र होते. बुमराहला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात कायम ठेवलं आहे, तर जॅनसेनवर लिलावात बोली लागेल. पदार्पणाच्या कसोटी मालिकेत जॅनसेनने 19 विकेट काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने भारतीय फलंदाजांना या मालिकेत चांगलेच सतावले.

जोहान्सबर्गच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराह आणि जॅनसेनमध्ये मैदानावर वाद झाला होता. पंचांना मध्यस्थी करावी लागली होती. जॅनसेन बुमराहवर बाऊन्सर चेंडूचा मारा करत होता. त्यावरुन वातावरण तापलं होतं. जॅनसेनचं हे आक्रमक वर्तन माजी सलामीवीर अ‍ॅशवेल प्रिन्सला आवडलं.

त्याने देशाला पहिलं प्राधान्य दिलं

“दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत मालिकेत मी आणखी एका गोष्टीचा आनंद घेतला. बुमराह बरोबर झालेल्या लढाईतून जॅनसेनने माघार घेतली नाही. त्याने आयपीएलचा विचार केला नाही. तिथल्या लोकांबरोबर संबंधांवर काय परिणाम होईल, हा विचार त्याने केला नाही. त्याने देशाला पहिलं प्राधान्य दिलं” असे प्रिन्सने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

एक इंचही सोडायचं नसतं

“खूप सुंदर मुला, स्वत:ला बदलू नको. जसा आहेस तसा राहा. तू जसा आहेस, तसं लोकांनी तुला स्वीकारल नाही. आदर दिला नाही, तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. खेळ म्हणजे स्पर्धा आहे. एक इंचही सोडायचं नसतं” असं प्रिन्सने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. केपटाऊनची तिसरी कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने ही मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने दिलेले 212 धावांचे लक्ष्य आफ्रिकेच्या संघाने आरामात पार केले. आता 19 जानेवारीपासून वनडे मालिका सुरु होईल.

(Marco Jansen didn’t think about IPL Ashwell Prince hails SA pacer for his battle with Jasprit Bumrah)

Published On - 5:20 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI