MI IPL 2025 : मुंबई आयपीएल ट्रॉफीच्या प्रतिक्षेत, कॅप्टन हार्दिक 4 वर्षांनंतर जिंकवणार?
Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्सला गेल्या काही वर्षात चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे यंदा या 18 व्या मोसमात चाहत्यांना पलटणकडून धमाकेदार कामगिरीसह ट्रॉफीची अपेक्षा असणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 18 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. आयपीएल स्पर्धेचा क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत लीग असा लौकीक आहे. या स्पर्धेच्या प्रत्येक हंगामाची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असते. या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सलामीचा सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. त्यानंतर 23 मार्चला मुंबई इंडियन्सचा या मोहिमेतील पहिला सामना खेळणार आहे. मुंबईसमोर पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान असणार आहे. या हंगामानिमित्ताने आपण या स्पर्धेतील पहिल्या आणि सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाबाबत जाणून घेऊयात.
मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक आणि प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफी जिंकली आहेत. मात्र मुंबई या स्पर्धेतील पहिली यशस्वी टीम आहे. मुंबईने सर्वात आधी 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबईने अफलातून कामगिरी केली. रोहितने त्याच्याच नेतृत्वात मुंबईला पाचही ट्रॉफी मिळवून दिल्या. मुंबईला 2010 साली चेन्नईविरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर मुंबईने दणक्यात कमबॅक केलं.
पलटणची कामगिरी
मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल ट्रॉफी जिंकलीय. मात्र त्यानंतर मुंबईला काही खास करता आलं नाही. मुंबईची गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी राहिली होती. मुंबईला 17 व्या मोसमात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मुंबईला गेल्या हंगामात शेवटच्या अर्थात दहाव्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आता 18 व्या मोसमात कॅप्टन हार्दिक आणि पलटणवर मुंबईला 2020 नंतर चॅम्पियन्स करण्याची जबाबदारी असणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, कॉर्बिन बॉश आणि अश्वनी कुमार.