शेवटची विकेट घेण्यापूर्वी सिराजच्या डोक्यात काय सुरु होतं? ब्रूकचा झेल आणि सगळं काही सांगितलं…
भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली आणि इंग्लंडचं त्यांच्या भूमीत दणका दिला. खरं तर पाचवा कसोटी सामना अतितटीचा झाला होता. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा आशा अनेकांनी सोडून दिल्या होत्या. पण पाचव्या दिवशी चमत्कार झाला आणि टीम इंडियाने विजय मिळवला.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताने अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. खऱं तर पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची गरज होती आणि चार विकेट हातात होत्या. त्यामुळे हा सामना इंग्लंड सहज जिंकेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजी केली आणि इंग्लंडला रोखलं. मोहम्मद सिराजने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 30.1 षटक टाकत 104 धावा दिल्या आणि पाच विकेट घेतल्या. दरम्यान, ख्रिस वोक्स फलंदाजीला येईल की नाही याबाबत शंका होती. पण हात मोडल्यानंतरही ख्रिस वोक्स फलंदाजीसाठी आला. गस एटकिनसनने त्याला शेवटपर्यंत स्ट्राईक दिली नाही आणि एका बाजूने झुंज सुरु ठेवली. त्याने एक षटकार मारला आणि भारताच्या विजयाचा आशा मावळल्या. आता काही खरं नाही असंच वाटत होतं.
कर्णधार शुबमन गिलने त्याच्याकडे 7 धावांची गरज असताना षटक सोपवलं. प्रत्येक भारतीय क्रीडाप्रेमी देवाचं नाव घेत असावा आणि चमत्कार घडावं तसंच झालं. इंग्लंडला विजयासाठी 7 धावांची गरज होती आणि स्ट्राईकला गस एटकिनसन होता. पण पहिल्याच चेंडूवर सिराजने त्याचा त्रिफळा उडवला आणि भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर मोहम्मद सिराजने सांगितलं की, ‘मी फक्त विचार करत होतो की मी योग्य क्षेत्रात गोलंदाजी करावी. खरे सांगायचे तर, मी (ब्रूक) झेल घेईन आणि दोरीवर पाऊल ठेवेन असे मला वाटले नव्हते. तो सामना बदलणारा क्षण होता. हो, मी नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवला की मी संघासाठी हे करेन.’
पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या. त्या बदल्यात इंग्लंडने 247 धावा केल्या आणि 23 धावांची आघाडी घेतली. भारताने ही आघाडी मोडली तसेच एकूण 396 धावा केल्या. पण त्यातून 23 धावा वजा करत 373 धावा आल्या आणि विजयासाठी 374 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान गाठताना इंग्लंडचा संघ 367 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला.
