IPL 2025 : देश महत्त्वाचा की पैसा? 5 खेळाडूंच्या निर्णयामुळे एकच चर्चा
IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी एकाच संघातील 5 खेळाडूंनी देशासाठी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या ते कोण आहेत.

क्रिकेट चाहत्यांना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर आयपीएलच्या 18 व्या मोसमाचे (IPL 2025) वेध लागले आहेत. आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार 22 मार्च ते 25 मे दरम्यान रंगणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत लीग असा आयपीएल स्पर्धेचा लौकीक आहे. आयपीएल स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली आहे. तसेच अनेक युवा खेळाडूंना हक्काचं प्लॅटफॉर्म मिळालं आहे. तसेच प्रस्थापित खेळाडूही मालामाल झाले आहेत. आयपीएलसाठी अनेक विदेशी खेळाडू भारतात येतात. या आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमासाठी 5 खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला आहे. हे खेळाडू आयपीएलसाठी टी 20I मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्याआधी अनेक खेळाडू हे आपल्या टीमसह जोडले जात आहेत. न्यूझीलंडचे 5 खेळाडू आयपीएलसाठी आपल्या संघात सामील होण्यासाठी मायदेशात होणाऱ्या टी 20I मालिकेत खेळणार नाहीत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेसाठी मंगळवारी 11 मार्चला 15 सदस्यीय संघ जाहीर केला. डेव्हॉन कॉनव्हे, लॉकी फर्ग्यूसन, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र आणि मिचेल सँटनर या खेळाडूंचा आयपीएलमुळे टी 20I मालिकेत समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे या 5 खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
हे पाचही खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या टी 20I मालिकेत खेळणार नसल्याचं न्यूझीलंड क्रिकेटने आधीच स्पष्ट केलं होतं. पाकिस्तान विरुद्ध टी 20I-एकदिवसीय मालिकेचं आणि आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक मिळतंजुळतं आहे. हा निर्णय खेळाडूंच्या फायद्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढण्यासाठी घेण्यात आल्याचं न्यूझीलंड क्रिकेटने स्पष्ट केलं.
कोणते खेळाडू कोणत्या संघांसह?
न्यूझीलंडमधील 5 पैकी 2 खेळाडू हे चेन्नई सुपर किंग्ससह जोडले जाणार आहेत. डेव्हॉन कॉनव्हे आणि रचीन रवींद्र हे दोघे चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातले आहेत. लॉकी फर्ग्यूसन पंजाब, मिचेल सँटनर मुंबई इंडियन्स आणि ग्लेन फिलिप्स गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
दरम्यान दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याने देशासाठी आयपीएलच्या 18 व्या मोसमातून माघार घेतली. हॅरीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही माहिती दिली. हॅरीची आयपीएल स्पर्धेआधी माघार घेण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. त्यामुळे हॅरीवर बीसीसीआयकडून 2 वर्षांच्या बंदीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. नियमांनुसार, दुखापत आणि वैद्यकीय कारण वगळता, ऑक्शनमध्ये सोल्ड झाल्यानंतर खेळाडूने स्पर्धेआधी खेळण्यास नकार दिल्यास त्याच्यावर 2 वर्षांची बंदीची कारवाईची तरतूद आहे.
