Cricket : टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, तिघे आऊट, कुणाला संधी? पाहा वेळापत्रक
T20i Series 2026 : ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विरूद्धच्या टी 20i मालिकेतील 3 सामन्यांसाठी 17 खेळाडूंना संधी दिली आहे. या मालिकेला 29 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला मोजून काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया या टी 20i मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी सोमवारी 19 जानेवारीला 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार आहे. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलिया बोर्डाने या मालिकेसाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आणि दुखापतीमुळे संघात स्थान दिलेलं नाही. तर काही खेळाडूंना वगळण्यात आलंय. अशात या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. आता कुणाला विश्रांती आणि कुणाला डच्चू मिळालाय? हे जाणून घेऊयात.
जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन एलिस, टीम डेव्हीड या प्रमुख खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंट आणि दुखापतीमुळे संधी मिळाली नाहीय. तसेच स्टीव्हन स्मिथ याला वगळण्यात आलंय. स्मिथला बीबीएल स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतरही संधी मिळालेली नाही.
टीम डेव्हीडच्या दुखापतीबाबत काय?
टीमला हॅमस्ट्रिंगमुळे पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेला मुकावं लागलं आहे. “टीमला या दुखापतीतून बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र टीम 7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी फिट होईल” असा विश्वास निवड समिती प्रमुख जॉर्ज बेली यांनी व्यक्त केला. तसेच जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स हे दोघेही दुखापतीतून सावरत आहेत.
निवड समितीकडून कुणाला संधी?
निवड समितीने 20 वर्षीय वेगवान गोलंदाज माहली बेअर्डमन आणि ऑलराउंडर झॅक एडवर्ड्स या 2 नव्या दमाच्या शिलेदारांचा समावेश केला आहे. या दोघांनी बीबीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच जोरावर या दोघांना संधी मिळाली. आता या दोघांना टी 20i पदार्पणाची प्रतिक्षा आहे. माहलीचा टीम इंडिया विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी संघात सामवेश करण्यात आला होता. तर एडवर्ड्स टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील संघाचा भाग होता. आता हे दोघे संधी मिळाल्यास कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 29 जानेवारी, लाहोर
दुसरा सामना, 31 जानेवारी, लाहोर
तिसरा सामना, 1 फेब्रुवारी, लाहोर
पाकिस्तान विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, झेव्हीयर बार्टलेट, माहली बेअर्डमन, कूपर कॉनली, बेन ड्वार्शुइस, झॅक एडवर्ड्स, कॅमेरुन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिच ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅट शॉर्ट, मार्क्स स्टोयनिस आणि एडम झॅम्पा.
