PAK vs BAN : बांगलादेशने बनवलं बाबर आझमला ‘गिऱ्हाईक’, कसोटीच्या चार डावात आला तसा पाठवून दिला
पाकिस्तान क्रिकेट हे सध्या बाबर आझम या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण बाबर आझमचा फॉर्म पूर्णपणे गेलेला आहे. बांगलादेशविरुद्धही त्याला धावा करणं कठीण झाल्याचं आहे. दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात त्यांने एकूण 64 धावा केल्या आहेत. दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना रावलपिंडी येथे सुरु आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे बांगलादेशकडे 1-0 ने आघाडी आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यावरही बांगलादेशने मजबूत पकड मिळवली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की ओढावू शकते असं चित्र आहे. या संपूर्ण मालिकेत बाबर आझमच्या निराशाजनक कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोन्ही कसोटी मालिकेतील चार डावात बाबर आझम फेल ठरला. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या डावात गरजेवेळी फक्त 11 धाव करून तंबूत परतला. सर्वात मोठी बाब म्हणजे बांगलादेशसाठी तिसरा कसोटी सामना खेळणाऱ्या युवा नाहिद राणाने त्याची विकेट काढली. बाबर आझम कसोटीच्या 16 डावात फेल ठरला आहे. यात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलेलं नाही. 16 कसोटी डावातील त्याच्या फलंदाजीची सरासरी 20.68 टक्के आहे. यात त्याने एकूण 331 धावा केल्या आहेत. 41 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे.
बांगलदेशविरुद्धची कसोटी मालिका बाबर आझमसाठी एक वाईट स्वप्न ठरलं आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात तर त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 22 धावा करून बाद झाला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण तिथेही अपेक्षा भंग झाला आणि 31 धावा करून तंबूत परतला. दुसऱ्या डावात काहीतरी करेल अशी आस लावून त्याचे चाहते बसले होते. पण दुसऱ्या डावात त्याचा खेळ फक्त 11 धावांवर संपला. बाबरच्या या खेळीमुळे पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आहे. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर आता दुसऱ्या कसोटी सामन्यावर पराभवाचं सावट आहे.
बाबर आझम मागच्या तीन कसोटी सामन्यात सलग फेल होत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात फक्त 76 धावा केल्या. त्यावेळी सरासरी 25.33 होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यात 21 च्या सरासरीने 126 धावा करता आल्या. तर बांगदेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात 16 च्या सरासरीने 64 धावा केल्या आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 या कालावधीत बाबर आझमने 20.46 च्या सरासरीने 266 धावा केल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर बाबर आझमला ट्रोल केलं जात आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावरून त्याची खिल्ली उडवली जात आहे.
