PAK vs ENG: इंग्लंड कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल, पहिला सामना केव्हा?
Pakistan vs England Test Series 2024 : बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत लोळवलं होतं. त्यानंतर आता इंग्लंड पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड टीम या मालिकेसाठी मुल्तानमध्ये दाखल झाली आहे.
इंग्लंडला मायदेशात कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका गमवाली लागली. पाचव्या आणि अंतिम सामन्यात पावसामुळे ऑस्ट्रेलियाने डीएलएसनुसार सामन्यासह मालिका जिंकली. त्यानंतर इंग्लंड आता कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंचं मुल्तानमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. खेळाडूंना कडेकोट बंदोबस्तात विमानतळावरुन हॉटेलमध्ये आणलं गेलं. खेळाडूंचं पारंपरिक पद्धतीने पाकिस्तानमध्ये स्वागत केलं गेलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर इंग्लंडच्या खेळाडूंच्या स्वागतचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मुल्तानमध्ये सलामीचा सामना
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.मालिकेतील सलामीचा सामना हा 7 ऑक्टोबरपासून होणार आहे. पाकिस्तानला गेल्या कसोटी मालिकेत बांगलादेशकडून 2-0 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानसमोर या मालिकेत इंग्लंडचं कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे पाकिस्तान मायदेशात कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
दरम्यान इंग्लंडने याआधी 21 महिन्यांआधी पाकिस्तान दौरा केला होता. तेव्हा इंग्लंडने 2022 साली टी20i आणि कसोटी अशा दोन्ही मालिका जिंकल्या होत्या. इंग्लंडने पाकिस्तानला टेस्ट सीरिजमध्ये 3-0 ने क्लिन स्वीप केलं होतं. तर 7 सामन्यांची टी 20i मालिका 4-3 ने जिंकली होती.
इंग्लंड टीम मुल्तानमध्ये दाखल
England’s Test team receives a traditional welcome as they arrive in Multan! 🛬#PAKvENG pic.twitter.com/ZYEHJ6xpVJ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 2, 2024
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 7 ते 11 ऑक्टोबर, मुल्तान
दुसरा सामना, 15 ते 19 ऑक्टोबर, मुल्तान
तिसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, रावळपिंडी
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम : शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम : बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, गस एटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ओली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ओली स्टोन आणि क्रिस वोक्स.