PAK vs ENG: पाकिस्तानची चांगलीच जिरवली, बाबर-रिजवान 24 तासात फेल, इंग्लंडने वाजवला बँड
PAK vs ENG: मोठ्या विजयामुळे हवेत असलेल्या पाकिस्तानच्या टीमला इंग्लंडने जमिनीवर आणलं

मुंबई: फक्त 24 तासात पाकिस्तानी टीमला इंग्लंडने जमिनीवर आणलं. एकाबाजूला नागपूरमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय मिळवला. त्याचवेळी कराचीमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा बँड वाजवला. एकदिवसआधी याच कराचीच्या मैदानावर बाबर आजम-मोहम्मद रिजवानने ऐतिहासिक खेळ दाखवला होता. दोघांनी मोठी भागीदारी केली होती. पाकिस्तानकडून या विजयाचे ढोल बडवले जात होते. पण इंग्लंडने 24 तासात या पराभवाचा वचपा काढला.
दिग्गज नव्हते, तरीही इंग्लंडची सरशी
कराचीत दोन्ही टीम्समध्ये तिसरा टी 20 सामना झाला. या मॅचमध्ये इंग्लिश टीमने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये कमाल केली. त्यांनी पाकिस्तानचा 63 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या टीममध्ये जोस बटलरसह काही दिग्गज खेळाडू नव्हते. मात्र तरीही इंग्लंडने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला.
तीन युवकांची कमाल
इंग्लंडच्या टीममध्ये तीन नवीन फलंदाज जागा पक्की करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलच धुतलं. टीमला 221धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
23 वर्षा युवा फलंदाजाने चोपलं
डेब्यु करणारा युवा ओपनर विल जॅक्सने जोरदार सुरुवात केली. त्याने 40 धावा फटकावल्या. त्यानंतर 23 वर्षाचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक आणि बेन डकेटने पाकिस्तानी गोलंदाजांची वाट लावली. दोघांनी फक्त 69 बॉलमध्ये 139 धावांची नाबाद भागीदारी केली. 3 विकेटवरच इंग्लंडने 221 धावांचा डोंगर उभारला.
ब्रूकने फक्त 35 चेंडूत 81 धावा चोपल्या. यात 8 चौकार आणि 5 षटकार होते. डकेटने 42 चेंडूत 70 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 1 षटकार होता.
बाबर-रिजवानचा फ्लॉप शो
दुखापतीमधून सावरलेल्या मार्क वुडने 6 महिन्यानंतर इंग्लंडकडून मैदानात पुनरागमन केलं. डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टॉपलीला सुद्धा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. या दोन्ही गोलंदाजांनी पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं. बाबर आजम (8) आणि मोहम्मद रिजवान (8) रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतले. वुडने बाबरला आऊट केलं. टॉपलीने रिजवानला बोल्ड केलं.
पाकिस्तानकडून कोण चांगलं खेळलं?
पाकिस्तानकडून फक्त शान मसूदने 40 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या. वर्ल्ड कप टीममधील आपली निवड योग्य असल्याचं त्याने सिद्ध केलं. पाकिस्तानच्या संपूर्ण टीमने 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडच्या टीमने 63 धावांनी विजय मिळवला.
