PAK vs UAE : यूएईसमोर 147 धावांचं आव्हान, पाकिस्तानला पराभूत करत Super 4 मध्ये पोहचणार?
Pakistan vs United Arab Emirates Asia Cup 2025 : यूएईने आर या पार अशा सामन्यात पाकिस्तानला 146 धावांवर रोखलं आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल.

आशिया कप 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती 2 संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. दोन्ही संघांनी याआधीच्या 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर 1 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी एकमेकांविरुद्ध हा सामना सुपर 4 नुसार निर्णायक आणि करो या मरो असा आहे. अटीतटीच्या या सामन्यात पाकिस्तानने यूएईसमोर 147 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 146 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता होम टीम यूएई दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 147 धावा करुन सुपर 4 मध्ये धडक देत पाकिस्तानचा या स्पर्धेतून बाजार उठवणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
पाकिस्तानची बॅटिंग
यूएईने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूएईने पाकिस्तानला पावरप्लेमधील पहिल्या 3 ओव्हरमध्ये 2 झटके दिले. सॅम अयुब या सामन्यातही भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. सॅमची झिरोवर आऊट होण्याची सलग तिसरी तर गेल्या 6 डावातील चौथी वेळ ठरली. सॅमनंतर साहिबजादा फरहान 5 रन्सवर आऊट झाला.
त्यानतंर फखर झमान आणि कॅप्टन सलमान आघा या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 61 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर सलमान आघा 20 रन्सवर आऊट झाला. फखर झमान याने अर्धशतक झळकावलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. फखरने पाकिस्तानसाठी या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. फखरने 36 बॉलमध्ये 138.89 च्या स्ट्राईक रेटने 50 रन्स केल्या. फखरने या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोर लगावले.
यूएईच्या गोलंदाजांसमोर मिडल ऑर्डरने गुडघे टेकले. हसमन नवाझ 4 आणि खुशदिल याने 4 धावा केल्या आणि आऊट झाले. मोहम्मद नवाझ यालाही फक्त 4 धावा करता आल्या. हरीस रौफ याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र मोहम्मद हारीस आणि शाहिन आफ्रिदी या जोडीने अखेरच्या क्षणी निर्णायक धावा जोडल्या. त्यामुळे पाकिस्तानला सन्मानजनक आणि तुलनेत आव्हानात्मक धावांचं आव्हान ठेवता आलं. हारीसने 14 बॉलमध्ये 18 रन्स केल्या. तर शाहीनने 14 चेंडूत 2 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 29 रन्स केल्या.
यूएईसाठी जुनैद सिद्दीकी याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. जुनैदने 4 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा दिल्या. सिमरनजीत याने तिघांना मैदानाबाहेरचा दाखवला. तर ध्रुव पराशर याने 1 विकेट मिळवली. आता यूएई हे आव्हान पूर्ण करत सुपर 4 मध्ये धडक देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
