PAK vs ZIM : पाकिस्तानच्या बॉलरची हॅटट्रिक, झिंबाब्वेवर 69 धावांनी मात करत फायनलमध्ये एन्ट्री
Usman Tariq Hat Trick : उस्मान तारीक याने हॅटट्रिक घेत पाकिस्तानला एकूण तिसरा आणि झिंबाब्वे विरुद्ध दुसरा विजय मिळवून दिला. पाकिस्तानने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमने टी 20I ट्राय सीरिजमधील चौथ्या आणि आपल्या तिसऱ्या सामन्यात झिंबाब्वेवर 69 धावांनी मात केली आहे. रावळपिंडीत आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानने झिंबाब्वेसमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पाकिस्तानने झिंबाब्वेला 19 व्या ओव्हरमध्येच ऑलआऊट केलं. पाकिस्तानने झिंबाब्वेला 126 रन्सवर ऑलआऊट केलं. झिंबाब्वेला गुंडाळण्यात स्पिनर उस्मान तारिक याने प्रमुख भूमिका बजावली. उस्मानने हॅटट्रिक घेतली. पाकिस्तानचा हा सलग आणि एकूण तिसरा विजय ठरला. तर झिंबाब्वेला 3 सामन्यांमधून दुसऱ्यांदा पराभूत व्हावं लागलं.
पाकिस्तानने 20 ओव्हरपर्यंत 195 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करताना झिंबाब्वेची पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर घसरगुंडी झाली. झिंबाब्वेची 4 आऊट 59 अशी स्थिती झाली. त्यानंतरही झिंबाब्वेकडे टफ फाईट देण्याची संधी होती. मात्र 10 व्या ओव्हरमध्ये उस्मान तारीक आऊट होताच झिंबाब्वेची आशा मावळली.
उस्मान तारीकची हॅटट्रिक
उस्मान तारीक याने हॅटट्रिक घेत क्रिकेट सामना एकतर्फी केला. उस्मानने 10 व्या ओव्हरमधील दुसर्या बॉलवर टोनी मुनयोंगा याला आऊट केलं. त्यानंतर उस्मानने पुढील बॉलवर ताशिंगा मुसेकिवा याला बोल्ड केलं. त्यानंतर वेलिंग्टन मसाकाद्जा याला आऊट केलं. वेलिंग्टन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. उस्मानने यासह हॅटट्रिक घेतली. उस्मान यासह पाकिस्तानसाठी टी 20i क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला.
तारीकने ही ओव्हर मेडन टाकली. त्यानंतर तारीकने त्याच्या कोट्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये आणखी 1 विकेट घेतली. तारीकने अशाप्रकारे 4 ओव्हरमध्ये 18 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या. तर इतरांना काही खास करता आलं नाही. झिंबाब्वे अशाप्रकारे 19 ओव्हरमध्ये 126 रन्सवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानने यासह विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आणि अंतिम फेरीत रुबाबात धडक दिली.
पाकिस्तानची बॅटिंग
त्याआधी अनुभवी फलंदाज बाबर आझम याने अर्धशतक झळकावलं. बाबरने 74 धावा केल्या. तर साहिबजादा फरहान याने 63 रन्स केल्या. तर फखरने अखेरच्या क्षणी 10 बॉलमध्ये 27 रन्स करत फिनिशिंग टच दिला. त्यामुळे पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 195 धावा करता आल्या. झिंबाब्वेकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी फक्त तिघांनाच विकेट घेण्यात यश आलं. कॅप्टन सिकंदर रझा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर रिचर्ड नगरावा आणि ब्रॅड एव्हान्स या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
