IND vs PAK: महामुकाबल्याआधी नाकावर फटका, खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर, टीमला झटका
India vs Pakistan U19 World Cup 2026 : क्रिकेट चाहत्यांना अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. मात्र त्याआधी नाकावर बॉलचा फटका बसल्याने खेळाडूला स्पर्धेतूनच बाहेर व्हावं लागलं आहे.

भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारीपासून टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. साखळी फेरी आटोपल्यानंतर आता सुपर 6 फेरीतील सामने खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत 1 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्याची क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा लागून आहे. या स्पर्धेत 1 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असणार आहेत. उपांत्य फेरीच्या हिशोबाने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र त्याआधी पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. एका खेळाडूला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. या खेळाडूला सराव सत्रादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे सामन्यातून आऊट व्हावं लागलंय.
पाकिस्तानचा खेळाडू आऊट
पाकिस्तानच्या खेळाडूला अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान दुखापत झालीय. भारत विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद शायान याला दुखापत झाली. शायानला सरावादरम्यान दुखापत झाली. गोलंदाजासोबत विकेटकीपिंगचा सराव करताना शायानच्या नाकावर बॉल लागला. त्यानंतर शायानला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर शायानचं नाक फ्रॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शायानच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
पाकिस्तानसाठी दिलासा काय?
शायानला दुखापत झाली असली तरी पाकिस्तानला काही प्रमाणात दिलासा आहे. कारण, पाकिस्तानचा ओपनर हमजा जहूर हा देखील विकेटकीपर आहे. त्यामुळे हमजा जहूर टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात विकेटकीपिंग करताना दिसू शकतो. मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शायान पाकिस्तानकडून या स्पर्धेत एकूण 2 सामने खेळला. शायानने इंग्लंड विरुद्ध 7 धावा केल्या. तर शायानला न्यूझीलंड विरुद्ध बॅटिंगची संधी मिळाली नाही.
पाकिस्तानची स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी
दरम्यान पाकिस्तानची या मोहिमेतील सुरुवातच पराभवाने झाली. मात्र त्यानंतर पाकिस्तानने जोरदार कमबॅक करत सलग तिन्ही क्रिकेट सामने जिंकले. पाकिस्तानने स्कॉटलँड, झिंबाब्वे आणि न्यूझीलंडला पराभूत करत सुपर 6 फेरीत धडक दिली होती. आता पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडिया विरुद्ध मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. अशात आता पाकिस्तान टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
