Asia Cup Rising Stars 2025 स्पर्धेसाठी टीम जाहीर, इंडिया-पाकिस्तान भिडणार, महामुकाबला कुठे?
India vs Pakistan : क्रिकेट चाहत्यांना येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर आणि चिरप्रतिद्वंदी संघात हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पीसीबीने आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup Rising Stars) संघ जाहीर केला आहे.

भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात काही आठवड्यांआधी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात करत टी 20I आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. तर पाकिस्तानला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इतर संघांनीही चमकदार कामगिरी केली. मात्र त्यांचं ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण झालं नाही. आता सिनिअर क्रिकेट टीमनंतर ज्युनिअर खेळाडू आशिया कप स्पर्धेत आपली कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या काही दिवसांत आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदाच्या मोसमापासून या स्पर्धेच्या नावात बदल करण्यात आला आहे. याआधी एमर्जिंग आशिया कप असं या स्पर्धेचं नाव होतं. आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तान ए टीमची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी मुहम्मद इरफान खान याला कॅप्टन केलं आहे.
सिनिअर टीममधील तिघांचा ए संघात समावेश
पाकिस्तानने या ए टीममध्ये युवा खेळाडूंना संधी देत त्यांच्या प्रतिभेला न्याय दिला आहे. या स्पर्धेनिमित्ताने त्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याचं व्यासपीठ मिळालंय. पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग, अंडर 19 आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंचा ए टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच 3 खेळाडू असेही आहेत जे सिनिअर पाकिस्तान टीममध्येही खेळले आहेत. या तिघांमध्ये सुफियान मुकीम, अहमद दानियाल आणि मुहम्मद इरफान यांचा समावेश आहे. सुफियान ही फिरकीपटू तर अहमद वेगवान गोलंदाज आहे.
स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती
या स्पर्धेतील सर्व सामने हे कुवेतमधील दोहा इथे होणार आहेत. स्पर्धेत त्या देशातील प्रमुख नाही तर ए क्रिकेट टीम सहभागी होणार आहेत. स्पर्धेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील 8 संघांना 4-4 प्रमाणे ए आणि बी अशा 2 गटांत विभागण्यात आलंय. या 8 संघांमध्ये फायनलसह एकूण 15 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतील सर्व सामने हे एकाच मैदानात होणार आहे. दोहातील वेस्ट एन्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत.
दरम्यान या स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे हे 2 संघ भिडणार असल्याचं निश्चित आहे.
पाकिस्तानचं वेळापत्रक
पहिला सामना, 14 नोव्हेंबर, विरुद्ध ओमान
दुसरा सामना, 16 नोव्हेंबर, विरुद्ध भारत
तिसरा सामना, 18 नोव्हेंबर, विरुद्ध यूएई
पाकिस्तान शाहीन्स टीम: अहमद दानियाल, अराफात मिन्हास, माज सदाकत, मोहम्मद फॅक, मुहम्मद गाजी गौरी, मुहम्मद इरफान खान (कर्णधार), शाहिद अजीज, सुफियान मुकीम, उबेद शाह, यासिर खान, मोहम्मद नईम, मोहम्मद सलमान, मोहम्मद शाहजाद, मुबासिर खान आणि साद मसूद.
