Rahul Dravid यांचा तडकाफडकी मोठा निर्णय, हेड कोचपदाचा राजीनामा, राजस्थान रॉयल्सला झटका
Rajasthan Royals Head Coach Radhul Dravid Resign : राजस्थानची आयपीएलच्या 18 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. त्यानंतर आता हेड कोच राहुल द्रविड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज कर्णधार राहुल द्रविड यांनी मोठा निर्णय घेतला आहे. द्रविड यांनी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. द्रविड गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्ससह जोडले गेले होते. मात्र द्रविड यांना हेड कोच म्हणून छाप सोडता आली नाही.
भारतीय संघाने 2024 साली रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात टी 20I वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर द्रविड राजस्थान रॉयल्ससह हेड कोच म्हणून जोडले गेले. द्रविडने याआधी राजस्थानचं 2011 ते 2013 पर्यंत प्रतिनिधित्व केलं. तर 2015 साली राजस्थानसाठी मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळली. मात्र आता द्रविडने राजस्थानला रामराम केलं आहे.
प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं?
“मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांनी आयपीएल 2026 आधी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सच्या अनेक वर्षांच्या प्रवासात केंद्रस्थानी राहिले. द्रविड यांनी त्यांच्या नेतृत्वात अनेक खेळाडू घडवले”,असं राजस्थान रॉयल्सने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तसेच टीम मॅनेजमेंटने राहुल द्रविड यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांचे आभार मानले.
राजस्थानची आयपीएल 2025 मधील कामगिरी
दरम्यान आयपीएलच्या पहिल्याच हंगामात शेन वॉर्न याच्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सला 18 व्या मोसमात काही खास करता आलं नाही. राजस्थानची 18 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. राजस्थानला 14 पैकी फक्त 4 सामनेच जिंकता आले. तर 10 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या स्थानी राहिली. आता द्रविड यांच्यानंतर आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी (IPL 2026) राजस्थानच्या मुख्य प्रशिक्षकपदी कुणाची निवड केली जाणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
राजस्थान रॉयल्सकडून द्रविडचे आभार
Your presence in Pink inspired both the young and the seasoned. 💗
Forever a Royal. Forever grateful. 🤝 pic.twitter.com/XT4kUkcqMa
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 30, 2025
द्रविडची आयपीएल कारकीर्द
दरम्यान राहुल द्रविडने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या 2 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. द्रविडने 89 सामन्यांमधील 82 डावांमध्ये 115.52 च्या स्ट्राईक रेटने आणि 28.23 च्या सरासरीने 2 हजार 174 धावा केल्या आहेत. द्रविडने आयपीएल कारकीर्दीत 11 अर्धशतकं ठोकली. द्रविडने 28 षटकार आणि 268 चौकार लगावले.
