Ranji Trophy: दोनदा चेंडू मारल्याने फलंदाजाला दिलं बाद, आर अश्विनने शिकवला नियम
रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेत मणिपूर विरुद्ध मेघालय सामन्यात हिट द बॉल ट्वॉईस नियमाचा आधार घेत खेळाडूला बाद दिलं. यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. कारण विकेटला लागण्यापूर्वी चेंडू मारला की जाणीवपूर्वक मारला हे काही स्पष्ट नाही. पण आर अश्विनने यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेतील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मणिपूरच्या फलंदाजाने चेंडूवर दोनवेळा बॅटने प्रहार केल्याने बाद दिलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. त्या फलंदाजाला असं कसं आऊट दिलं? नेमकं काय चुकलं वगैरे प्रश्न विचारले जात आहेत. मेघालय विरुद्ध मणिपूर यांच्यात सामना सुरू असताना हा प्रकार घडला. झालं असं की, मणिपूरचा फलंदाज लामबम सिंह प्लेट ग्रुप सामन्यात फलंदाजी करत होता. तेव्हा त्याने चेंडू डिफेंड केलेा. पण चेंडू डिफेंड केल्यानंतर स्टंपकडे जात होता. ते पाहून फलंदाजाने चेंडूवर प्रहार केला आणि स्टंपला लागण्यापासून रोखलं. पण हा प्रकार पाहताच उपस्थित प्रेक्षक आऊट असं जोरात ओरडू लागले. प्रेक्षकांच्या अपीलनंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनेही अपील केलं. पंच धर्मेश भारद्वाज यांनी चेंडू दोनदा मारल्याप्रकरणी लामबम सिंहला बाद दिलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बाद होणं दुर्मिळ आहे.
आर अश्विनने या विकेटवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. रविचंद्रन अश्विनने एक्सवर मजेशीर अंदाजात आपलं म्हणणं मांडलं. “आज मी गली क्रिकेटमध्ये सर्वात दुर्मिळ गुन्ह्यासाठी बाद झालो – दोनदा चेंडू मारणे. पहिला शॉट: बचाव केला. दुसरा शॉट: माझे स्टंप वाचवण्यासाठी पॅनिक स्वाइप केला. तिसरी गोष्ट: संपूर्ण प्रेक्षक वर्ग वर्ल्ड कप फायनलपेक्षाही मोठ्याने ‘आउट!’ असा ओरडला. त्यानंतर रणजी ट्रॉफीत लामबम सिंहला चेंडूवर दोनदा प्रहार केल्याने बाद दिलं गेलं. अशा पद्धतीने गली क्रिकेटमध्ये बाद दिलं जातं. खरं तर क्रिकेटच्या नियमानुसार नाही.,” असे आर अश्विनने लिहिले.

काय सांगतो एमसीसी नियम?
एमसीसी नियम 34.1.1 नुसार, चेंडू फलंदाजाने खेळल्यानंतर पुन्हा जाणीवपूर्वक चेंडूवर बॅटने किंवा शरीराच्या कोणत्याही भागाने प्रहार केला तर त्याला बाद दिलं जातं. पण फलंदाजाने चेंडू स्टम्पवर आदळण्यापासून रोखलं तर बाद नसतो.
लामबम सिंहने चेंडू जाणीवपूर्वक मारला की स्टंपवर आदळण्यापूर्वी संरक्षणात्मक मारला हे स्पष्ट झालेलं नाही. पण पंचांना यात जाणीवपूर्वक दिसलं असावं. त्यामुळेच त्यांनी बाद दिलं असावं अशी चर्चा आता रंगली आहे. जम्मू आणि काश्मीरचा ध्रुव महाजन शेवटचा 2005 मध्ये झारखंडविरुद्ध अशा प्रकारे बाद झाला होता.
