अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू खेळी, आता संघाला सावरण्याची धडपड
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत गोवा आणि कर्नाटक हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात गोव्याची स्थिती नाजूक आहे. पण अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दुसऱ्या दिवशीच्या त्याच्या खेळीकडे लक्ष असेल.

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत गोव्याचा सामना कर्नाटकशी होत आहे. या सामन्यातील अष्टपैलू खेळीने अर्जुन तेंडुलकरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुरुवातीला गोलंदाजीत योगदान दिलं. त्यानंतर फलंदाजीतही योगदान देत संघाला सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोव्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकने 110.1 षटकांचा सामना करत सर्व गडी गमवून 371 धावा केल्या. यात करूण नायरची 174 धावांची नाबाद खेळी राहिली. तर गोव्याकडून अर्जुन तेंडुलकर भेदक गोलंदाजीचं प्रदर्सन करत कर्नाटकच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. अर्जुन तेंडुलकरने 29 षटकं टाकत 10 धावा देत 3 गडी बाद केले. त्याने कर्नाटकचा ओपनर निकिन जोस, कृषण श्रीजित आणि अभिनव मनोहर यांना तंबूचा रस्ता दाखवला. अचूक टप्प्याची गोलंदाजी करत त्याने कर्नाटकच्या फलंदाजांना दबावात आणलं होतं. अर्जुनच्या भेदक माऱ्यामुळे गोव्याचा संघ सामन्यात टिकून राहिला.
कर्नाटकने पहिल्या डावात केलेल्या 371 धावांचा पाठलाग करताना गोव्याची पडझड झाली. निम्म्याहून अधिक संघ अवघ्या 115 धावांवर तंबूत परतला आहे. दर्शन मिसाळची पाचवी विकेट पडल्यानंतर अर्जुन तेंडुलकर मैदानात आला. तेव्हा संघाची स्थिती 100 वर 5 विकेट अशी होती. त्यानंतर अर्जुन तेंडुलकर आणि ललित यादव यांच्यात 15 धावांची भागीदारी झाली. ललित यादव 96 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. संघाच्या फक्त 115 धावा आणि 6 विकेट तंबूत अशी स्थिती होती. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने मोहित रेडकरसोबत मोर्चा सांभाळला. अर्जुनने 115 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 43 धावा केल्या. तर मोहित रेडकर नाबाद 24 धावांवर खेळत आहे.
गोव्याचा संघ अजूनही 200 धावांनी पिछाडीवर आहे. तर हातात फक्त 4 विकेट आहेत. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरकडून फार अपेक्षा आहेत. अर्जुन तेंडुलकर आता संघाला या संकटातून कसा सावरतो याकडे लक्ष असेल. त्याला नाबाद 43 धावांची खेळी आणखी पुढे घेऊन जावी लागणार आहे. पण कर्नाटकच्या गोलंदाजांचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. पण अर्जुन तेंडुलकरला या दबावात आत्मविश्वास कामी येणार आहे. या पर्वात अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडून आता तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला तळाच्या फलंदाजांनी तशी साथ देणंही गरजेचं आहे.
