सरफराजने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं! करूण नायरची जागा धोक्यात? झालं असं की…
सरफराज खान गेल्या वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली. पण इग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून डावलण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्याने टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे.

देशांतर्गत बुच्ची बाबू स्पर्धा सुरू असून भारतीय खेळाडू या स्पर्धेत आपली छाप सोडत आहे. मुंबईकडून खेळणाऱ्या सरफराज खानने या स्पर्धेत पुन्हा एकदा जबरदस्त खेळी केली आहे. दुसरं शतक ठोकत टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. हरियाणाविरुद्धच्या सामन्यात त्याने कोणालाही सोडलं नाही. समोर येईल त्या गोलंदाजाची धुलाई केली.सरफराज खानने 100 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने संघासाठी 112 चेंडूत 111 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि पाच षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे मुंबईचा संघ मजबूत स्थितीत आला आहे. खरं तर मुंबईची स्थिती 4 बाद 84 अशी होती. त्यामुळे मधल्या फळीतील सरफराज खानकडून अपेक्षा होत्या. त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि संघाला संकटातून बाहेर काढलं. सरफराज खानने यापूर्वी टीएनसीए इलेव्हनविरुद्ध 138 धावांची नाबाद खेळी केली होती.
सरफराज खानने पाचव्या विकेटसाठी हार्दिक तामोरेसोबत पाचव्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. दोघांनी हरियाणाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या दोघांच्या भागीदारीमुळे संघ संकटातून बाहेर आला. हार्दिक तामोरेने 39 धावांची खेळी केली. सरफराज खानने त्याच्या या खेळीसह पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. ऑक्टोबर महिन्यात आशिया कप स्पर्धेनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. अशा स्थितीत करूण नायरची जागा डळमळीत होताना दिसत आहे. त्याच्या जागी सरफराज खानला संधी मिळू शकते.
मागच्या वर्षी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा सरफराज खानने या मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्याने जबरदस्त खेळी करून चाहत्यांचं मन जिंकलं होतं. पण इंग्लंड दौऱ्यात त्याला संघात काही संधी मिळाली नाही. आता पुन्हा एकदा त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईने बुच्ची बाबू स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी एका सामन्यात पराभव, तर एक सामना ड्रॉ झाला आहे. मुंबईचा संघ या स्पर्धेतील सी गटात सर्वात खालच्या स्थानावर आहे.
