ENG vs IND : शार्दूल ठाकुरची प्लेइंग ईलेव्हनमध्ये जागा फिक्स! लॉर्डमुळे या खेळाडूचा पत्ता कट होणार?
Shardul Thakur England vs India 1st Test Playing 11 : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर लॉर्ड अर्थात शार्दूल ठाकुर याने इंन्ट्रा स्क्वॉड मॅचमध्ये शतक ठोकलंय. शार्दुलने या शतकी खेळीसह पहिल्या टेस्टमधील प्लेइंग ईलेव्हनसाठी दावा ठोकला आहे.

इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा हेडिंग्ले, लीड्स येथे होणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी काही दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. तर दुसर्या बाजूला भारतीय संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी द्यायची? हा तिढा अजूनही कायम आहे. कसोटी मालिकेआधी इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरिज पार पडली. ही मालिका 0-0 ने बरोबरीत राहिली. या मालिकेत करुण नायर याने द्विशतक, केएल राहुल याने शतक तर ध्रुव जुरेल याने 2 अर्धशतकं झळकावली. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला घ्यायचं हा पेच सुटता सुटत नव्हता.
त्यानंतर आता इन्ट्रा स्क्वॉड मॅचमध्ये मुंबईकर सर्फराज खान याच्यानंतर शार्दूल ठाकुर याने शतक झळकावलं. शार्दुलने इन्ट्रा स्क्वॉड मॅचमध्ये 122 धावांची खेळी केली. सर्फराजची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही. मात्र शार्दुल कसोटी संघाचा भाग आहे. त्यामुळे शार्दुलची पहिल्या कसोटीत प्लेइंग ईलेव्हनमध्ये जागा फिक्स झालीय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
प्लेइंग ईलेव्हनमधील 2 जागांसाठी तिढा होता. त्यानुसार, शार्दुल विरुद्ध नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजा विरुद्ध वॉशिंग्टन सुंदर या चौघांपैकी कोणत्या दोघांना घ्यायचं? हा तिढा होता. मात्र शार्दूलच्या शतकी खेळीमुळे चित्र आणखी स्पष्ट झालं आहे. तसेच शार्दूल नितीशपेक्षा अनुभवी आहे. शार्दूलला इंग्लंडमध्ये 3 कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. तर नितीशने फक्त 5 कसोटी सामने खेळले आहेत, तेही फक्त ऑस्ट्रेलियात. त्यामुळे शार्दूलला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. आता कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल शार्दुलसाठी नितीश कुमार रेड्डीला बाहेर बसवण्याचा निर्णय घेणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर भारताला अनुभवाची गरज लागणार आहे. त्यामुळे शार्दूल संघात असणं फायदेशीर ठरु शकतं.
शार्दुल कमबॅकसाठी सज्ज
दरम्यान शार्दुल जवळपास 18 महिन्यांपासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. शार्दुलने अखेरचा कसोटी सामना हा डिसेंबर 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर शार्दुलला संधी मिळाली नाही. मात्र शार्दुलने दरम्यानच्या काळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे आता चाहते शार्दुलला पुन्हा एकदा टेस्ट टीम इंडियात पाहण्यासाठी उत्सूक आहेत.