Video : वर्ल्डकप खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूकडून मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप, विकेट असे पडत होते की…
क्रिकेटविश्व अनेकदा मॅच फिक्सिंगच्या अनेकदा हादरलं आहे. काही खेळाडूंना याची गंभीर शिक्षाही भोगावी लागली आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे गंभीर आरोप होतात तेव्हा तेव्हा खळबळ उडते. कारण यामुळे क्रिकेटच्या प्रामाणिक खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आता असाच एक गंभीर आरोप भारतीय क्रिकेटपटूने केला आहे.

मुंबई : मॅच फिक्सिंग हा शब्द ऐकला तरी क्रीडारसिकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. कारण खेळाप्रती प्रामाणिक न राहिल्याने त्याच्या दृष्टीकोन बदलून जातो. त्यामुळे जगभरात मॅच फिक्सिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते. असं सर्व असताना भारतीय विकेटकीपर फलंदाज श्रीवत्स गोस्वाममी मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप केला आहे. बंगाल क्रिकेट संघाच्या फर्स्ट क्लास लीग सामन्यात काही खेळाडू आऊट झाले, त्यावरून हा सामना फिक्स असल्याचा आरोप श्रीवत्स गोस्वामी याने केला आहे. श्रीवत्स गोस्वामी 2008 अंडर 19 वर्ल्डकप संघाचा सदस्य होता. श्रीवत्सने आपल्या फेसबुक पेजवर मोहम्मडन स्पोर्टिंग आणि टाऊन क्लब यांच्यातील सामन्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने मोहम्मडन स्पोर्टिंगच्या खेळाडूंवर गंभीर आरोप केला आहे. टाऊन क्लबला विजय मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक आऊट होत होते असे सांगितलं आहे. या गंभीर आरोपानंतर क्रिकेट मंडळ खळबळून जागं झालं आहे.
भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक आणि कॅबचे सचिव देबब्रत दास टाऊन क्लबशी जोडलेले आहेत. देबब्रत दास 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक होते. त्यांची या प्रकरणावर अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही. दुसरीकडे, कॅबचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी सांगितलं की, पंच आणि निरीक्षकांकडून अहवाल मागितला आहे. या गंभीर आरोपानंतर स्पर्धा कमिटीची 2 मार्च रोजी बैठक बोलावली आहे.
श्रीवत्स गोस्वामीने लिहिलं की, “मला हे सर्व पाहून लाज वाटते की हा खेळ मी खेळलो जो माझ्या हृदयाच्या जवळ आहे. मला क्रिकेट आवडतं आणि मला बंगालमध्ये खेळायला आवडतं. पण हे सर्व पाहून माझं मन दुखावलं आहे. क्लब क्रिकेट, बंगाल क्रिकेटचं हृदय आणि आत्म आहे. कृपया त्याचं नुकसान करू नका. मला वाटतं की मी क्रिकेटला जागवण्याचं काम केलं आहे. आता मीडिया कुठे आहे?”
श्रीवत्स गोस्वामीचं फर्स्ट क्लास क्रिकेट करिअर
यष्टीरक्षक फलंदाज श्रीवत्स गोस्वामी याने 2009 ते 2022 दरम्यान बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. श्रीवत्स गोस्वामीने 2022 पासून मिझोरमकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. श्रीवत्सने 61 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 32.46 च्या सरासरीने 3019 धावा केल्या आहेत. श्रीवत्सने 4 शतकं आणि 17 अर्धशतकं ठोकली आहेत.
