T20I Tri-Series 2025 Final : पाकिस्तानने श्रीलंकेला 6 गडी राखून नमवलं, जेतेपदावर कोरलं नाव
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने फक्त 114 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पाकिस्तानने सहज गाठलं.

पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तिरंगी मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेची दाणादाण उडाली. श्रीलंकेने 19.1 षटकात सर्व गडी गमवून 114 धावा केल्या. तसेच विजयासाठी 115 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तानने सहज गाठलं. 18.4 षटकात 4 गडी गमवून विजयी आव्हान गाठलं. पाकिस्तानकडून तसं पाहिलं तर आक्रमक खेळी तर कोणी केली नाही. पण सावध खेळी करत विजय मिळवला. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने 22 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 23 धावा केल्या. सैम अयुबने 33 चेंडूत 6 चौकार मारत 36 धावा केल्या. सलमान आघाने 14 चेंडूत 14 धावा केल्या. फखर जमान 5 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. पण दुसऱ्या बाजूने बाबर आझमचं टुकूटुकू खेळणं सुरु होतं. त्याने 34 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 37 धावा केल्या. तर उस्मान खानने 4 चेंडूत नाबाद 3 धावा केल्या.
श्रीलंकेचा डाव
श्रीलंकेकडून एकमेव कामिल मिशाराने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 114 धावांपैकी 59 धावा केल्या. त्याने 47 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारत 59 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त पाथुम निसंकाना 11 आणि कुसम मेंडिसने 14 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. पवन रत्ननायकेने 8, कुसल परेराने 1, शनाकाने 2, जनिथ लियांगेने 0, वानिंदु हसरंगाने 5, चमिराने 0,थीक्षाणाने 1 धाव करून बाद झाले. तर इशान मलिंगा नाबाद 0 धावांवर राहिला. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने 3, मोहम्मद नवाजने 3, अब्रार अहमदने 2, सलमान मिर्झाने 1 आणि सैय अयुबने 1 गडी बाद केला.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, सैम अयुब, बाबर आझम, सलमान आगा (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सलमान मिर्झा, अबरार अहमद.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कर्णधार), पवन रथनायके, वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, एशान मलिंगा
