“धर्माच्या नावावर…”, मोहम्मद सिराजची पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन पोस्ट, गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो शेअर करत मोठी मागणी
Mohammad Siraj on Pahalgam Terrorist Attack : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. सिराजने या दरम्यान पहलगााम दहशतवादी हल्ल्यावरुन पोस्ट केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले. देशातील विविध राज्यातून पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या या निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला. या भ्याड हल्ल्यात मृतांच्या नातेवाईकांपैकी अनेकांनी मुलगा, ताई, आई, बाबा यांना गमावलं. या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात संतापाचं वातावरण आहे. भारताने या दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर द्यावं आणि त्यांना ठेचून काढावं, अशा आक्रमक भावना आहेत. या सर्व प्रकारावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहेत. तसेच कारवाई करण्याची मागणीही होत आहे. अशात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सोशल मीडियावर पोस्ट करत मोठी मागणी केली आहे.
पहलगाम हल्ल्यावरुन क्रिकेटर विराट कोहली, मोहम्मद शमी आणि इतर क्रिकेटपटूंनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यानंतर मोहम्मद सिराज यानेही त्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मोहम्मद सिराजने त्याच्या सोशल मीडियावरुन गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो पोस्ट करत नक्की काय म्हटलंय? जाणून घेऊयात.
मोहम्मद सिराजकडून भ्याड हल्ल्याचा निषेध
मोहम्मद सिराज याने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तसेच सिराजने अमित शाह यांचा मृतांना श्रद्धांजली देतानाचा फोटो पोस्ट केला आहे. “आता आता पहलगाममधील भयानक आणि दुख:द दहशतावादी हल्ल्याबाबत वाचलं. ही फार दुख:द घटना आहे. धर्माच्या नावावर निष्पाप लोकांना मारणं हे मानवतेला कालिमा फासणारं कृत्य आहे. कोणतंही कारण या अशा विचारांचं किंवा क्रूर कृत्याचे समर्थन करू शकत नाही”, असं सिराजने म्हटलं.
ही कसली लढाई आहे, जिथे माणसाच्या जीवाची कोणतीच किंमत नाही. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांना किती दुःख आणि धक्का बसला असेल याचा विचार करुन मनाला खूप वेदना होतात. मृतांच्या कुटुंबियांना या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी शक्ती मिळावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. ही हिंसा लवकरच थांबेल, तसेच दोषींना कठोर शिक्षा होईल, ज्यामुळे ते पुन्हा कधीही कुणाचंही नुकसान करू शकणार नाहीत”, असंही सिराजने आपल्या पोस्टमधून नमूद केलं आहे.
सिराजची पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील पोस्ट
jahaan insaan ki jaan ki koi keemat hi nahi.. I can’t even begin to imagine the pain and trauma the families must be going through.. May the families find the strength to survive this unbearable grief. We are so sorry for your loss. I hope this madness ends soon and these…
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) April 23, 2025
आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व
दरम्यान मोहम्मद सिराज सध्या आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व करत आहे. सिराजने या मोसमात आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने याच मोसमात आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. सिराजने या हंगामात 17 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. सिराजने आतापर्यंत गुजरातच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गुजरात ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे.
