Rohit Sharma : “वर्ल्ड कप जिंकल्यावर जीवात थोडासा जीव आलाय”, कॅप्टन रोहितचा व्हीडिओ व्हायरल
Rohit Sharma Marathi Speech Video: रोहित शर्मा याने पुन्हा एकदा मराठीत बोलत उपस्थितीत क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली.तसेच वर्ल्ड कप विजयानंतर माझ्या जीवात थोडा जीव आल्याचं हिटमॅनने सांगितलं.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताने रोहितच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवलं. तर अनेक द्विपक्षीय मालिकेत धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या दोन्ही वर्ल्ड कपने भारताला अखेरच्या क्षणी हुलकावणी दिली. मात्र टीम इंडियाने जून 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आणि सर्व उणीव भरुन काढली. कॅप्टन रोहित शर्मा याने भारताला 2007 नंतर पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला. वर्ल्ड कप जिंकून आता 3 महिन्यांपेक्षा जास्त वेळ झालाय. मात्र त्यानंतर वर्ल्ड कप विजयाचा उत्साह तसाच आहे. कॅप्टन रोहितने वर्ल्ड कप विजयानंतर त्याला कसं वाटतंय हे एका जाहीर कार्यक्रमात सांगितलंय.
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता जीवात जीव आलाय, असं रोहितने म्हटलं. कॅप्टन रोहितने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात क्रिकेट स्टेडियम आणि क्रीडा संकुलांचं भूमीपूजन केल्यानंतर हे विधान केलं. अहमदनगरमधील कर्जत येथील राशीन येथे रोहित शर्माचं जंगी स्वागत करण्यात आलं. रोहितला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर रोहित पवार यांनी कॅप्टन रोहितला कर्जत जामखेडकरांसह बोलण्याची विनंती केली. रोहितने मराठीतून संवाद साधला.
रोहित शर्माची मराठी
“कसं काय कर्जत-जामखेडकरांनो? मला येथे बोलावलं यासाठी मी पहिल्यांदा रोहित दादा यांचा आभारी आहे. माझं मराठी चांगलं नाहीय, पण मी प्रयत्न करणार. भारतासाठी मागच्या गेल्या 3-4 महिन्यात जे झालं, आम्ही वर्ल्ड कप जिंकलो. आम्हाला वर्ल्ड कप जिंकायचाय हे आमचं मोठं लक्ष्य होतं. वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडा जीव आलाय”, असं म्हणत रोहित हसला.
हिटमॅन रोहितची मराठीतून ‘फटकेबाजी’
📍#Live Rohit Sharma in Rashin, Karjat-Jamkhed https://t.co/Q4iezwMqrb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 3, 2024
“पुढचे यशस्वी-बुमराह इथूनच”
“मी इथे कशासाठी आलोय हे तुम्हाला माहित आहे. क्रिकेट सर्वांना आवडणारा खेळ आहे. आम्ही इथे क्रीडा संकुल उभं करणार आहोत. मला 100 टक्के खात्री आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल सगळे इथूनच येणार”, असा विश्वास रोहितने व्यक्त केला. रोहितने यासह त्याचं मराठीतील संवाद आटोपतं घेत उपस्थितांचे आभार मानले.
