BCCI ने इशान किशन, अय्यर यांच्यावर केलेल्या धडक कारवाईवर कपिल देव म्हणाले…
Kapil Dev on BCCI : टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलसारख्या स्पर्धांसाठी फिट असतात. मात्र देशासाठी खेळायचं म्हटलं की दुखापती किंंवा काही कारणे देतात. बीसीसीआयने कठोर भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. अशातच यावर कपिल देव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : बीसीसीआयने टीम इंडियाच्या केंद्रीय वार्षिक करार असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये बीसीसीआयने दोन खेळाडूंवर कारवाई केल्याचं दिसून आलं. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना करारामध्ये ठेवलं नाही. या यादीत नव्या अकरा खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे. तर सात खेळाडूंना करारमुक्त करण्यात आलं. दोन खेळाडूंवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे इतर खेळाडूही सतर्क झाले आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयावर आजी माजी खेळाडूंनी कौतुक केलं आहे. अशातच भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयने नवीन वार्षिक कराराची यादी जाहीर केली. यावर बोलताना, काही खेळाडूंना आणि काही लोकांना याचा त्रास होईल. परंतु देशापेक्षा मोठी कोणीच नाही. बीसीसीआयने घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या हितासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. बोर्डाने हे पाऊल उचलल्याने मी त्यांचं अभिनंदन करतो. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिद्ध केल्यावर तो देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देत नाही आणि खेळणं थांबवतो. याचंं मला वाईट वाटतं मात्र बोर्डाने घेतलेला हा निर्णय याआधीच घ्यायला हवा होता, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी वेळ मिळाल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या राज्यासाठीही खेळायला हवं. बीसीसीआयने वार्षिक करारामध्ये माजी खेळाडूंची पेन्शन वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. कारण या पेन्शनवरच काही खेळाडूंची कुटूंबाच उदरनिर्वाह अवंलबून असल्याचं म्हणत कपिल देव यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
टीम इंडियाच्या वार्षिक करारबद्ध खेळाडूंची यादी
ए प्लस | रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
ए | रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.
बी | सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल.
सी | रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.
