वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत टीम इंडियाचे किती गुण? अंतिम फेरीसाठी अजून किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या
भारताने बांगलादेशला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने धोबीपछाड दिला आहे. या विजयासह भारताचं गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम आहे. तसेच या विजयामुळे भारताच्या विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. आता भारताला आठ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी किती सामन्यात विजय मिळवला तर अंतिम सामन्यात स्थान पक्क होईल ते जाणून घेऊयात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशला अपेक्षेप्रमाणे धोबीपछाड दिला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवला आणि व्हाईटवॉश दिला. यासह भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबर फायदा झाला आहे. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी होती. आता बांगलादेशला दुसऱ्या सामन्यातही पराभूत केल्याने विजयी टक्केवारी 74.24 इतकी झाली आहे. त्यामुळे भारताचं अव्वल स्थान तर पक्कं आहे. आता उर्वरित आठ सामन्यात भारताला विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे. दुसरीकडे, बांगलादेशचं पराभवामुळे नुकसान झालं आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर तिसरं स्थान गाठलं होतं. पण दोन सामन्यांच्या मालिकेत पराभव झाल्याने विजयी टक्केवीरी 39.29 वरून 34.37 इतकी झाली आहे. तसेच पाचव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारताला आता न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
भारताला अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी या 8 सामन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. भारताला त्यांच्या शेवटच्या 8 पैकी 5 सामने जिंकावे लागतील.बांगलादेशसोबतच्या मालिकेनंतर भारत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. भारतासमोर खरे आव्हान ऑस्ट्रेलियाचं असणार आहे. कारण 5 सामन्यांच्या कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात असणार आहे. त्यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली, तर त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त दोन विजयांची आवश्यकता असेल.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारताने दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पण दोन्ही वेळेस भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21 मध्ये अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना झाला होता. तेव्हा न्यूझीलंडने भारताला 8 विकेटने पराभूत केलं होतं. त्यानंतर 2021-2023 या स्पर्धेत पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. तेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात ट्रेव्हिस हेडने 163 धावांची खेळी केली होती.