ENG vs IND : थरारक विजयानंतरही भारताचं जल्लोष न करण्यामागचं कारण समोर, नक्की काय?
Indian Cricket Team : टीम इंडियाने लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये झालेल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात अविस्मरणीय असा विजय मिळवला. या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र भारतीय क्रिकेटपटूंनी जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला. कारण काय? जाणून घ्या.

टीम इंडियाने सोमवारी 4 ऑगस्टला पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी इंग्लंडचा 6 धावांनी धुव्वा उडवत सनसनाटी विजय मिळवला. भारताने ओव्हलमधील या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी केली. भारताने यासह इंगंलडला मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारतासाठी हा विजय अनेकबाबतीत महत्वाचा ठरला. भारताची विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या निवृत्तीनंतरची पहिलीच कसोटी मालिका होती. मात्र टीम इंडियाच्या यंगब्रिगेडने या मालिकेत दमदार कामगिरी केली. भारताने जवळपास पाचवा सामना गमावला होता. मात्र टीम इंडियाने निर्णायक क्षणी कमबॅक करत इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. मात्र यानंतरही भारताने क्रिकेट चाहत्यांना अपेक्षित तसा जल्लोष केला नाही. असं नक्की काय केलं? याबाबत जाणून घेऊयात.
जल्लोष का नाही?
भारतासाठी पाचवा सामना हा मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा होता. त्यात दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत ही मॅचविनर जोडीही नव्हती. मात्र त्यानंतरही भारताने अप्रतिम कामगिरी केली. पाचव्या सामन्यातील नाट्यमय विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये ग्रँड सेलिब्रेशन केलं जाईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र तसं झालं नाही. भारतीय खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी कुटुंबियांसह वेळ घालवण्याला प्राधान्य दिलं.
“गेल्या रात्री कोणत्याही प्रकारे जल्लोष करण्यात आला नाही. ही एक लांब आणि शारिरीकदृष्ट्या थकवणारी मालिका होती. खेळाडूंनी एकट्यात किंवा कुटुंबियांसह वेळ घालवला. बहुतांश खेळाडू मायदेशी परतले आहेत. तर काही खेळाडू इंग्लंडमध्ये पर्यटनासाठी थांबून आहेत”, असं बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितलं.
खेळाडू मायदेशी रवाना
पाचवा सामना संपताच 24 तासांच्या आतच अनेक खेळाडू मायदेशी रवाना झाला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने पाचव्या कसोटीत सर्वाधिक आणि एकूण 9 विकेट्स घेत निर्णायक भूमिका बजावली. सिराज दुबईमार्गे हैदराबादला पोहचणार आहे. तसेच अर्शदीप सिंह आणि शार्दूल ठाकुर हे देखील मंगळवारी सकाळी इंग्लंडहून भारताच्या दिशेने परतले.
काही खेळाडूंचा विश्रांतीचा निर्णय
तसेच भारताच्या काही खेळाडूंनी इंग्लंडमध्ये थांबून विश्रांती करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंह आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी त्यांच्या कुटुंबासह लंडनमध्ये वेळ घालवला. तर कुलदीप यादव याने माजी फिरकीपटू पीयूष चावला याच्यासह लंडन भ्रमंती केली.
