Icc Odi Ranking : रोहितला झटका, विराटने सिंहासन हिसकावलं, किंग कोहली पुन्हा नंबर 1
Virat Kohli and Rohit Sharma Icc Odi Batting Ranking : विराट कोहली याचं 11 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यातील शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं होतं. मात्र विराटने त्या खेळीच्या जोरावर पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने पुन्हा एकदा धमाका केला आहे. विराटने सहकारी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मोठा झटका दिला आहे. विराट आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये रोहित शर्मा याला पछाडत नंबर 1 फलंदाज ठरला आहे. विराटने यासह रोहितकडे असलेलं सिंहासन हिसकावलं आहे. विराटने गेल्या 5 एकदविसीय डावांत 50 पेक्षा अधिक धावा केल्या. तसेच विराटने न्यूझीलंड विरुद्ध बडोद्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 93 धावांची खेळी केली होती. विराटला त्या खेळीचा रँकिंगमध्ये जबरदस्त फायदा झाला. विराटने त्या खेळीसह आयसीसी रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं. तर रोहितला अव्वल स्थान गमवावं लागलंय. रोहितला 2 स्थानांचं नुकसान झालंय. रोहितची थेट पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी घसरण झालीय. तसेच आयसीसीच्या या पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत विराट आणि रोहित व्यतिरिक्त भारताच्या आणखी दोघांचा समावेश आहे.
विराट पावणे 5 वर्षांनंतर नंबर 1
विराटने जवळपास पावणे 5 वर्षांनंतर वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. विराट 4 वर्ष आणि 9 महिने अर्थात 1 हजार 736 दिवसांनी एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज ठरला आहे. विराटने याआधी 13 एप्रिल 2021 रोजी आयसीसी बॅटिंग रँकिंगमध्ये पहिलं स्थान काबिज केलं होतं. मात्र पाकिस्तानच्या बाबर आझम याने दुसऱ्या दिवशी अर्थात 14 एप्रिलला विराटला मागे टाकलं होतं.
विराटचा झंझावात
विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्याने धावा करतोय. विराटने भारताच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावलं होतं. विराटने न्यूझीलंड विरुद्ध हाच तडाखा कायम ठेवला. विराटने 11 जानेवारी न्यूझीलंड विरुद्ध शतक करण्यात अपयशी ठरला. विराटचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. मात्र विराटने 93 धावांच्या खेळीसह आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याचा दावा मजबूत केला होता. त्यानंतर आता विराटने पहिल्या स्थानी झेप घेतलीय.
किंग कोहली विराट नंबर 1
India’s linchpin regains top spot after hitting a purple patch in ODIs 🔝
More on the latest ICC Men’s rankings 👇https://t.co/IKDkNetwgG
— ICC (@ICC) January 14, 2026
टॉप 10 मध्ये 4 भारतीय फलंदाज
विराटच्या खात्यात ताज्या आकडेवारीनुसार वनडे रँकिंगमध्ये 785 रेटिंग पॉइंट्स आहेत. न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल 784 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहितच्या खात्यात 775 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर कर्णधार शुबमन गिल पाचव्या आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर 10 व्या स्थानी विराजमान आहेत.