Vaibhav Suryavnshi : पुढच्या सामन्यात द्विशतक ठोकणार.., वैभव सूर्यवंशीची मोठी घोषणा
Vaibhav Suryavnshi On Double Hundred : वैभव सूर्यवंशी याने इंग्लंड विरूद्धच्या यूथ वनडे सीरिजमध्ये आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. वैभवने चौथ्या सामन्यात शतक ठोकलं. तर वैभव आता पाचव्या सामन्यात द्विशतक ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे.

अंडर 19 टीम इंडियाचा 14 वर्षीय युवा आणि विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इंग्लंड विरूद्धच्या पुढील सामन्यात द्विशतक ठोकण्याचा प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं आहे. वैभवने तसं केल्यास भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा वाढदिवस अविस्मरणीय होईल, त्याचं कारणही तसंच आहे. धोनीच्या वाढदिवशी अंडर 19 टीमचा पुढील सामना होणार आहे. अंडर 19 टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील युथ वनडे सीरिजमधील पाचवा आणि अंतिम सामना हा 7 जुलैला होणार आहे.
अंडर 19 टीम इंडियाने यूथ सीरिजमधील 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच पाचव्या सामन्यात वैभवने मोठी खेळी केल्यास भारतीय संघ विजयी चौकार मारणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे पाचव्या सामन्यात वैभवच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वैभव असं ठोकणार द्विशतक!
बीसीसीआयने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. वैभवने या मुलाखतीत पुढील सामन्यात द्विशतक ठोकण्याबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच वैभवने या व्हीडिओत 200 धावांचा टप्पा कसा गाठणार हे देखील सांगितलं आहे. माझा 50 ओव्हर खेळण्याचा प्रयत्न असणार आहे, असं वैभवने म्हटलं. “तसेच मी गेल्या सामन्यात आऊट झालो तेव्हा 20 पेक्षा अधिक षटकं बाकी होते”, असंही वैभवने म्हटलं. वैभव 28 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता.
वैभवचा चौथ्या सामन्यात धुमधडाका
वैभवने इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या सामन्यात स्फोटक खेळी केली. वैभवने 5 जुलैला झालेल्या सामन्यात 78 चेंडूत 143 धावांची खेळी केली. वैभवने या खेळीत 13 चौकार आणि 10 षटकार ठोकले. वैभवव्यतिरिक्त विहान मल्होत्रा याने 129 धावा केल्या. त्यामुळे भारताने 50 षटकांमध्ये 9 विकेट्स गमावून 363 धावा केल्या.
इंग्लंडनेही प्रत्युत्तरात जोरदार लढा दिला. मात्र डोंगराएवढ्या आव्हानासमोर इंग्लंडचे प्रयत्न अपुरे पडले. इंग्लंड 45.3 ओव्हरमध्ये 308 रन्स केल्या. भारताने अशाप्रकारे चौथा सामना 55 धावांनी जिंकला. भारताने या विजयासह मालिकाही जिंकली. आता भारतीय संघ पाचव्या सामन्यात इंग्लंडवर मात करत विजयी चौकार लगावणार का? याची उत्सकुता क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.
वैभवचं तडाखेदार शतक
1⃣4⃣3⃣ runs 7⃣8⃣ deliveries 1⃣3⃣ fours 🔟 Sixes 💥
14-year old Vaibhav Suryavanshi registered a century off just 52 deliveries, the fastest 💯 in U19 and Youth ODIs 🔥🔥
Scorecard – https://t.co/1UbUq20eKD#TeamIndia pic.twitter.com/ymXf3Ycmqr
— BCCI (@BCCI) July 5, 2025
वैभवच्या प्रशिक्षकांना आशा
दरम्यान वैभवकडून द्विशतक नाही तर किमान शतकाची आशा त्याच्या लहानपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांना आहे. वैभव मोठी खेळी करण्यासह धोनीला बर्थडे गिफ्ट देईल, असं मनीष ओझा यांनी म्हटलं.