IND vs SA : वैभव सूर्यवंशी-अॅरॉन जॉर्जचा शतकी तडाखा, दक्षिण आफ्रिकेसमोर 394 धावांचं आव्हान, टीम इंडिया सलग तिसरा सामना जिंकणार?
U19 IND vs SA 3rd One Day : वैभव सूर्यवंशी आणि अॅरॉन जॉर्ज भारताच्या या सलामी जोडीने द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताला भक्कम धावसंख्या उभारता आली. या दोन्ही सलामी फलंदाजांनी वैयक्तिक शतकही झळकावलं.

अंडर 19 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 390 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 394 धावांचं मजबूत आव्हान ठेवलं आहे. कर्णधार वैभव सूर्यवंशी आणि अॅरॉन जॉर्ज या सलामी जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 393 धावा केल्या आहेत. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया अंतिम सामना जिंकून विजयी हॅट्रिकसह दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्वीप करणार की यजमान लाज राखण्यात यशस्वी ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
वैभव आणि अॅरॉन या दोघांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करुन मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. मात्र वैभव आणि अॅरॉन आऊट झाल्यानंतर टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. वैभव आणि अॅरॉन या दोघांव्यतिरिक्त एकालाही 40 पारही पोहचता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अपवाद वगळता ठराविक अंतराने भारताला झटके दिले. त्यामुळे भारताला 400 पारही पोहचता आलं नाही. एक वेळ टीम इंडिया सहज 450 धावा करेल, असं चित्र होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कमबॅक करत चित्र बदललं.
पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी
वैभव आणि अॅरॉन या जोडीने पहिल्या विकेटसाठी 154 बॉलमध्ये 227 रन्स केल्या. वैभव आऊट होताच ही सेट जोडी फुटली. वैभवने 74 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 9 फोरसह 127 धावांची खेळी केली. वैभवनंतर अॅरॉनने तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या वेदांत त्रिवेदी याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अॅरॉनने या दरम्यान शतक ठोकलं. मात्र अॅरॉन वैभवप्रमाणे काही धावा जोडल्यानंतर बाद झाला. अॅरॉनने 106 बॉलमध्ये 16 फोरसह 118 रन्स केल्या. अॅरॉन आणि वेदांतने दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली.
टीम इंडियाची घसरगुंडी
अॅरॉन आऊट झाल्यानंतर टीम इंडियाच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेने कमबॅक करत भारताला झटपट 5 झटके दिले. वेदांत त्रिवेदी याने 34 तर अभिज्ञान कुंदुने 21 धावा जोडल्या. कनिष्क चौहान याने 10 धावा केल्या. तर इतर दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे भारताची 43.2 ओव्हरमध्ये 7 आऊट 335 असा स्कोअर झाला.
आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
त्यानंतर मोहम्मद एनान आणि हेनिल पटेल या दोघांनी आठव्या विकेटसाठी 41 बॉलमध्ये नॉट आऊट 53 रन्सची पार्टनरशीप केली. मोहम्मदने 28 तर हेनिलने 19 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे भारताला 350 पार पोहचता आलं.
