IND vs SA : भारताचा 233 धावांनी धमाकेदार विजय, सलग तिसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ
South Africa U19 vs India U19 3rd Youth ODI Match Result : आयुष म्हात्रे याच्या दुखापतीमुळे वैभव सूर्यवंशी याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नेतृत्वाची संधी मिळाली. वैभवने या मालिकेत स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध केलं. भारताने ही मालिका एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली.

अंडर 19 टीम इंडियाने 2026 या वर्षात अविस्मरणीय आणि ऐतिहासिक अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्या नेतृत्वात यजमान दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला आहे. वैभव सूर्यवंशी आणि अॅरॉन जॉर्ज या सलामी जोडीने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 394 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 35 ओव्हरमध्ये 160 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे या मालिकेतील एकूण आणि सलग तिसरा सामना जिंकला.भारताने यासह दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने क्लिन स्वीप केलं.
दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी
भारतीय गोलंदाजांनी 394 धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला झटपट 4 झटके देत बॅकफुटवर ढकललं आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या 4 पैकी 3 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर 1 फलंदाज आला तसाच बाद होऊन मैदानाबाहेर गेला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 4 आऊट 15 अशी बिकट स्थिती झाली. त्यानंतर मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदांजांनी छोटेखानी भागीदारी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके देणं सुरु ठेवलं होतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला काही करता आलं नाही.
दक्षिण आफ्रिकेसाठी फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. दक्षिण आफ्रिकेसाठी जेसन रोल्स, डॅनियल बॉसमन, पॉल जेम्स आणि कॉर्न बोथा या चौघांनी सर्वाधिक धावा केल्या. पॉल जेम्स 41, डॅनियल बॉसमन 40, कॉर्न बोथा याने नाबाद 36 तर जेसन रोल्स याने 19 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना भारतीय गोलंदाजांनी झटपट मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आणि सामना आपल्या नावावर केला.
भारताकडून एकूण 7 खेळाडूंनी गोलंदाजी केली. किशन कुमार सिंह आणि मोहम्मद एनान या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघत तंबूत पाठवला. किशनने 3 तर मोहम्मद एनान याने 2 विकेट्स मिळवल्या. तर कर्णधार वैभव सूर्यवंशी, हेनिल पटेल, कनिष्क चौहान, उधव मोहन आणि आरएस अंब्रिश या 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
वैभव आणि अॅरॉन सलामी जोडीकडून दक्षिण आफ्रिकेची तुडवणूक
त्याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीची संधी दिली. वैभव आणि अॅरॉन या सलामी जोडीने संधीचा फायदा घेतला. दोघांनी 227 धावांची सलामी भागीदारी केली. तसेच दोघांनी शतक झळकावलं. वैभवने 127 तर अॅरॉनने 118 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त वेदांत त्रिवेदी याने 34 धावा केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं. भारताने अशाप्रकारे 7 विकेट्स गमावून 393 धावा केल्या.
