Ranji Trophy Final : विदर्भ विरुद्ध केरळ फायनल मॅच ड्रॉ, असा ठरला विजेता संघ, जाणून घ्या नियम
Vidarbha vs Kerala Ranji Trophy Final 2024-2025 : विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यातील अंतिम सामना हा अनिर्णित राहिला. तर मग विदर्भ विजेता कसा? जाणून घ्या नियम.

रणजी ट्रॉफी 2024-2025 महाअंतिम सामन्यात विदर्भ विरुद्ध केरळ आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन 26 फेब्रुवारी ते 2 मार्च रोजी नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हा महाअंतिम सामना अनिर्णित राहिला. मात्र त्यानंतरही विदर्भाला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे मॅच ड्रॉ होऊनही कोणत्या आधारावर विदर्भाला विजयी जाहीर केलं गेलं? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. विजयी संघ कसा निश्चित केला गेला? याबाबत नियम काय आहे? जाणून घेऊयात.
सामन्यात काय काय झालं?
विदर्भाने दानिश मालेवार याच्या 153 धावांच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद 379 पर्यंत मजल मारली. केरळला विदर्भाच्या गोलंदाजांसमोर आघाडी घेणं सोडा मात्र बरोबरीही करता आली नाही. विदर्भाने केरळला पहिल्या डावात 125 ओव्हरमध्ये 342 धावांवर रोखलं. तर पाचव्या दिवसाचा (2 मार्च) खेळ संपेपर्यंत विदर्भाने दुसऱ्या डावात 143.5 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 375 धावा केल्या. विदर्भासाठी दुसऱ्या डावात करुण नायर याने सर्वाधिक धावा केल्या. करुणने 295 चेंडूत 2 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 135 धावांची खेळी केली. विदर्भाच्या बॅटिंगमुळे केरळला दुसऱ्या डावात बॅटिंगची संधीही मिळाली नाही. पाचव्या दिवसातील खेळाचा वेळ संपला आणि सामना अनिर्णित असल्याचं जाहीर करण्यात आलं.
विदर्भ आघाडीच्या जोरावर विजयी
विदर्भाला पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी घोषित करण्यात आलं. विदर्भाने 379 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या केरळला पहिल्या डावात 342वर गुंडाळलं. त्यामुळे विदर्भाला 37 धावांची आघाडी मिळाली. हीच आघाडी विदर्भासाठी सामना अनिर्णित राहिल्यानंतर निर्णायक ठरली. विदर्भाला याच आघाडीच्या जोरावर विजयी ठरवण्यात आलं. विदर्भाची यासह रणजी ट्रॉफी जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. नियमानुसार, रणजी ट्रॉफी स्पर्धेत सामना अनिर्णित राहिल्यानंतर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजयी संघ निश्चित केला जातो. हा नियम साखळी आणि बाद फेरीसाठीही आहे.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), ध्रुव शौरे, दानिश मलेवार, करुण नायर, यश राठोड, अक्षय कर्णेवार, हर्ष दुबे, पार्थ रेखाडे, नचिकेत भुते, दर्शन नळकांडे आणि यश ठाकूर.
केरळ प्लेइंग इलेव्हन : सचिन बेबी (कर्णधार), अक्षय चंद्रन, रोहन कुन्नम्मल, जलज सक्सेना, मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीपर), सलमान निझार, अहमद इम्रान, ईडन ऍपल टॉम, आदित्य सरवटे, एमडी निधीश आणि नेदुमनकुझी बेसिल.
