न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी धक्का, विराट कोहली या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट
विराट कोहली आता फक्त वनडे फॉर्मेटमध्येच खेळतो. त्यामुळे त्याला खेळताना पाहण्याची संधी फक्त वनडे मालिका आणि स्पर्धांमध्येच आहे. त्यामुळे चाहते वनडे मालिकेची वाट पाहात असतात. असं असताना विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

विराट कोहलीकडून नववर्षात चांगल्या खेळीची अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. त्यामुळे त्याला आक्रमक आणि सयंमी फलंदाजी करताना पाहण्याची इच्छा आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत खेळला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळताना दोन सामन्यात त्याने जबरदस्त खेळी केली. पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर थेट न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार असल्याचं बोललं जात होतं. पण यापूर्वी 6 जानेवारीला विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळणार असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मागच्या वर्षी म्हणजेच डिसेंबरच्या शेवटी विजय हजारे ट्रॉफीत दोन सामने खेळला होता. 6 जानेवारीला रेल्वेविरूद्धच्या सामन्यात खेळणार याबाबत डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनीही सांगितलं होतं. पण या सामन्याच्या एक दिवस आधी वाईट बातमी समोर आली आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, विराट कोहली 6 जानेवारीला रेल्वे विरूद्धच्या सामन्यात खेळणार नाही. पण या मागचं नेमकं कारण काय हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. यापूर्वी दिल्लीकडून खेळताना आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकलं होतं. तर गुजरातविरुद्ध 77 धावांची खेळी केली होती. त्यानंतर विराट कोहलीने संघाची साथ सोडली आणि मुंबईत आपल्या घरी आला आहे. त्यामुळे विराट कोहली आता विजय हजारे ट्रॉफीत खेळणार नाही. बीसीसीआयने विजय हजारे ट्रॉफीत किमान दोन सामने खेळण्याची अट ठेवली होती. विराट कोहलीने दोन सामने खेळले असल्याने त्याच्यावर तसा काही दबाव नाही. त्यामुळे विराट कोहली आता थेट 11 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्यासाठी उतरणार असल्याचं दिसत आहे.
दिल्लीचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी हिंदुस्तान टाईम्सला माहिती देताना सांगितलं की, “नाही, विराट कोहली पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही.” दुसरीकडे, मंगळवारी विजय हजारे ट्रॉफीत शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर खेळणार आहे. शुबमन गिल मागच्या सामन्यात आजारी पडल्याने खेळला नाही. आता गोव्याविरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे. तर श्रेयस अय्यरही तीन महिन्यानंतर मैदानात परतणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती.
