कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पराभव होणं कठीण? शुबमन गिलचा प्लान रेडी! आता बीसीसीआय…
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा दर्जा घसरला आहे. भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण आता कसोटी क्रिकेटसाठी शुबमन गिलने बीसीसीआयकडे प्रस्ताव ठेवला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी हवी तशी नाही. इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. पण भारतात झालेल्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-2 ने मात खावी लागली. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित बिघडलं आहे. इतकंच काय तर या मालिकेत दुखापतग्रस्त झालेल्या कर्णधार शुबमन गिलवरही टीका केली जात आहे. पहिला कसोटी सामना दुखापतीमुळे दहा फलंदाजांसह खेळावा लागला वगैरे… पण आता पुढे असं काही घडू नये यासाठी कर्णधार शुबमन गिलने कसोटीसाठी एक प्लान तयार केला आहे. हा प्रस्ताव शुबमन गिलने बीसीसीआयसमोर ठेवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शुबमन गिलने प्रत्येक कसोटी मालिकेपूर्वी 15 दिवसांचा कॅम्प ठेवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडे ठेवला आहे. भारतात गेल्या 13 महिन्यात खेळलेल्या दोन कसोटी मालिकेत व्हाईट वॉश मिळाला. याची कारण शोधण्यासाठी बीसीसीआयने सिलेक्टर्स आणि टीमच्या लीडरशिपची ग्रुप मीटिंग बोलावली होती. त्या बैठकीत शुबमन गिलने हा प्रस्ताव ठेवला आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी टाइम्स इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, मीटिंगमध्ये शुबमन गिलने स्पष्टपणे विचार मांडले. त्याचा प्लान ठरला होता. कसोटी मालिकेपूर्वी संघाची तयारी योग्य असणं गरजेचं आहे. प्रत्येक कसोटी मालिकेपूर्वी 15 दिवसांचा कँप ठेवला तर बरं होईल असं त्याने सांगितलं. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभव जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर 4 दिवसांनी कसोटी मालिका सुरु झाली. 29 सप्टेंबरला दुबईवरून मायदेशी परतल्यानंतर 2 ऑक्टोबरला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी खेळले होते. असंच दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही झालं. चार दिवसांआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून गिलसह भारताचे कसोटी खेळाडू परतले होते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय पुढच्या योजना आखण्यासाठी गिलला जास्तीत जास्त भूमिका देण्यासाठी आग्रही आहे. गिलने प्लानिंग विचारपूर्वक ठेवली आहे. यामुळे बोर्ड आणि सिलेक्टर यांनीही त्याला होकार दिला आहे. बीसीसीआय टीम इंडियाचा रेड बॉल कँप बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये लावण्याची शक्यता आहे. पण गिलच्या 15 दिवस आधी कँप लावण्याचा प्रस्ताव मान्य केला तरी तो व्यस्त वेळापत्रकात लागू करणं शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेट यांचा तालमेल बसवणंही वाटतं तितकं सोपं नाही.
