एक खेळाडू ज्याचे 13 पार्टनर, हाडाचा क्रिकेटर पण टेनिस खेळता खेळता अखेरचा श्वास, पदार्पणातच पाकिस्तानला भिडला!

वेस्ट इंडिजचे महान ओपनर बॅट्समन कॉन्राड हंट यांचा आज जन्मदिवस. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत वेस्ट इंडिजला अनेक सामने हातोहात फिरवून देणारे फलंदाज म्हणून त्यांची ओळख राहिली. (west indies Opner batsman Conrad hunte Born on this Day)

एक खेळाडू ज्याचे 13 पार्टनर, हाडाचा क्रिकेटर पण टेनिस खेळता खेळता अखेरचा श्वास, पदार्पणातच पाकिस्तानला भिडला!
कोन्राड हंट

मुंबई : वेस्ट इंडिजचे महान ओपनर बॅट्समन कॉन्राड हंट (Conrad hunte) यांचा आज जन्मदिवस. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत वेस्ट इंडिजला अनेक सामने हातोहात फिरवून देणारे फलंदाज म्हणून त्यांची ओळख राहिली. क्रिकेट जगतात कमालीचे ओपनर बॅट्समन म्हणून त्यांना ओळखलं जायचं. लेग साईटला ताकदीचे शॉट्स ते खेळायचे. त्यांच्या बॅटिंग करण्याच्या स्टाईलने जागतिक क्रिकेटमध्ये त्यांनी दबदबा निर्माण केला होता. आज त्यांचा वाढदिवस, आपण जाणून घेऊयात त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल… (West indies Opner batsman Conrad hunte Born on this Day)

वडिलांची इच्छा शिक्षक व्हावं, मुलगा झाला क्रिकेटर

बार्बाडोस येथे 9 मे 1932 साली कोन्राड हंट यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एका साखर कारखान्यात काम करायचे. वयाच्या 6 व्या वर्षीच त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांनी शिक्षक व्हावं, असं त्यांच्या वडिलांना वाटायचं. पण क्रिकेटची एवढी गोडी कोन्राड हंट यांना लागली की त्यांना स्वप्नात पण क्रिकेट ग्राऊंड दिसायचं. व्हायचं तेच झालं, आपल्या अफाट मेहनतीच्या जोरावर त्यांनी वेस्ट इंडित संघात पदार्पण केलं आणि पुढे आपल्या बॅटिंगच्या ताकदीवर भल्याभल्या बोलर्सला नाचवलं.

18 वर्षांचे असताना प्रथम श्रेणी पदार्पण

वयाच्या 18 व्या वर्षी कॉनराड हंटने बार्बाडोसविरूद्ध त्रिनिदादकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणात त्यांनी 63 धावांची खेळी केली. यानंतर वेस्ट इंडीज संघात 1957 च्या इंग्लंड दौर्‍यासाठी त्यांची निवड झाली.

पाकिस्तानला दाखवला इंगा

पहिल्याच कसोटीत हंट यांना सलामीवीर म्हणून पदार्पण करण्याची संधी मिळाली. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी पूर्ण दिवस फलंदाजी केली आणि 142 धावा फटकावून पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकून आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात त्यांनी केली. यानंतर पुढच्या 3 कसोटी सामन्यांत त्यांनी आणखी दोन शतके ठोकली.

एक खेळाडू, 10 वर्षांची क्रिकेट कारकीर्द आणि 13 ओपनिंग पार्टनर

कॉन्रड हंटची यांची क्रिकेट कारकीर्द 10 वर्षांची होती. या 10 वर्षात त्यांनी संघासाठी सलामी दिली. पण दुसऱ्या बाजूला दरम्यानच्या काळाच त्यांचे सलामी साथीदार बदलत राहिले. हंट यांनी 10 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 13 वेगवेगळ्या साथीदारांसह वेस्ट इंडिजच्या डावाचु सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी 44 कसोटी सामने खेळले आणि 45.04 च्या सरासरीने 8 शतकांसह 3245 धावा केल्या.

टेनिस खेळता खेळता मृत्यू

क्रिकेटला निरोप देऊनही हंट क्रिकेटपासून लांब गेले नाहीत. नंतरच्या काळात ते मॅच रेफरी बनले. 1998 मध्ये त्यांना ‘नाईटहूड’ ही पदवी देण्यात आली. तथापि, कॉन्राड हंट ‘सर’ कॉन्राड हंट झाल्याच्या एका वर्षानंतर कॅरेबियनच्या या महान फलंदाजाचा मृत्यू झाला. 1999 मध्ये सिडनी येथे टेनिस खेळत असताना हंट यांना हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

(West indies Opner batsman Conrad hunte Born on this Day)

हे ही वाचा :

‘ओरिजनल फिनिशर कोण?’, बेवनच्या वाढदिवशी आयसीसीने थेट धोनीला ट्रोल केलं, फॅन्स भडकले!

केविन पीटरसनच्या वाढलेल्या पोटावर ख्रिस गेलची जबरा कमेंट

करीनाच्या गाण्यावर प्राचीच्या अदा, पृथ्वी शॉ झाला फिदा, म्हणाला ‘कातिलाना’

Published On - 11:47 am, Sun, 9 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI