वर्ल्डकपमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुमममध्ये काय म्हणाले? सूर्यकुमार यादवने सांगितलं सर्वकाही
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पराभवामुळे संपूर्ण देशात निराशेचं वातावरण होतं. टीम इंडियाचे खेळाडूंना तर अश्रू अनावर झाले होते. काही खेळाडूंनी मैदानातच अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तर काही जणांनी अश्रू लपवत थेट ड्रेसिंग रुममध्ये धाव घेतली. निराशेचं वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंची भेट घेतली आणि सांत्वन केलं.

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 2003 अंतिम सामन्याची पुनरावृत्ती झाली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत स्वप्न भंग केला. त्यामुळे इतकी मेहनत घेऊन शेवटच्या क्षणी विजयापासून दूर जाणं ही सळ कायम राहते. सौरव गांगुलीनंतर रोहित शर्माच्या वाटेला हे दु:ख आलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी मैदानात हजर होते. पण ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू पराभवाने खचलेले दिसले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट ड्रेसिंग रुम गाठत खेळाडूंचं मनोबल वाढवलं. सर्व खेळाडूंची भेट त्यांना कानमंत्र दिला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले. पण तेव्हा नेमकं काय बोलणं झालं हे माहिती नव्हतं. मोहम्मद शमीनंतर आता सूर्यकुमार यादव याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय झालं होतं हे सूर्यकुमार यादवने सांगितलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये आले आणि प्रत्येक खेळाडूची भेट घेतली. तसेच सर्वांशी चर्चा केली. खेळात जय पराजय होत असतो. जेव्हा देशाचा पंतप्रधान आणि नेता असं सांगतो तेव्हा मनोबल वाढतं. पुन्हा एकदा आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.”, असं सूर्यकुमार यादव याने सांगितलं. सूर्यकुमार यादवने आगामी आयसीसी स्पर्धांबाबतही आपलं स्पष्ट मत मांडलं.
“आगामी आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. टी20 वर्ल्डकपमध्ये आम्ही आता जसं खेळलो तसंच खेळू. पुढच्या वर्षी वर्ल्डकप जिंकू अशी आशा आहे.”, असं सूर्यकुमार यादव याने सांगितलं. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे आहे.
टीम इंडिया : रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रवि बिश्नोई
