केएल राहुलने शतकी खेळी केल्यानंतर शिटी का वाजवली? जाणून घ्या त्या मागचं कारण
टीम इंडिया संकटात असताना पाचव्या स्थानावर उतरून केएल राहुलने डाव सावरला. शतकी खेळी करून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. पण त्याने शतक ठोकल्यानंतर शिटी वाजवून सेलीब्रेशन केलं. त्या मागचं कारण काय ते समजून घ्या.

भारत आणि न्यूझीलंड वनडे सामन्यातील दुसरा सामना राजकोटमध्ये होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने टीम इंडियाच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. टीम इंडियाने सावध सुरुवात केली होती. पण त्यानंतर धडाधड विकेट पडल्या. तीन विकेट पडल्यानंतर पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी केएल राहुल उतरला. तोच संघाची धावसंख्या 112 असताना विराट कोहलीच्या रुपान चौथी विकेट पडली. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे तंबूत गेले होते. त्यामुळे संघाला सावरण्याची जबाबदारी केएल राहुलवर आली होती. त्यामुळे त्याला सावधपणे खेळून धावांमध्ये भर घालण्याची मोठी जबाबदारी होती. केएल राहुलने रवींद्र जडेजासोबत अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश कुमार रेड्डी ही जोडी जमली. केएल राहुल एका बाजूने शतकाच्या दिशेन कूच करत होता. संघाला सावरत त्याने शतक पूर्ण केलं. त्याच्या संकटमोचक खेळीची चर्चा रंगली आहे. आता त्याचं अनोखं सेलिब्रेशनही चर्चेचं विषय ठरलं आहे.
केएल राहुलने षटकार मारून शतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने लगेच हेल्मेट काढलं आणि बॅट वर करून उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन केलं. त्यानंतर ग्लव्ह्ज काढले आणि शिटी वाजवू लागला. केएल राहुलचं असं सेलीब्रेशन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याने यापूर्वी कधीच असं सेलीब्रेशन केलं नव्हतं. मग असं करण्याचं कारण काय? खरं तर केएल राहुलने शिटी आपल्या मुलीसाठी वाजवली. नुकताच तिचा जन्म झाला आहे. शतकानंतर केएल राहुलने तिची आठवण काढली.
KL Rahul dedicating his century to his daughter ❤️ pic.twitter.com/RIMxuiSBVA
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) January 14, 2026
राजकोटमध्ये शतक ठोकताना केएल राहुलच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली. कारण या मैदानावर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत विराट-रोहित यांनाही या मैदानात शतक ठोकता आलेलं नाही. केएल राहुल नाबाद 112 धावांवर राहिला. इतकंच काय तर मधल्या फळीत त्याची संयमी फलंदाजीचं कौतुकही होत आहे. त्याने पाचव्या क्रमांकावर उतरून 64.21 च्या सरासरीने धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 100च्या जवळपास होता.