प्रतिका रावलला वर्ल्डकप विनिंग मेडल का मिळालं नव्हतं? कधी आणि कसं मिळालं? सर्वकाही जाणून घ्या
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी धुव्वा उडवला आणि पहिल्यांदा जेतेपद मिळवलं. या विजयाचा संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला गेला. मात्र प्रतिका रावलने या स्पर्धेत मेहनत घेऊनही मेडलपासून वंचित राहिली होती. तिला इतर खेळाडूंनी जेतेपदावेळी मान दिला, पण तिच्या गळ्यात मेडल नव्हतं. अखेर तिला मेडल मिळालं, पण का झालं ते समजून घ्या.

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास कठीण होता. एक एक कठीण टप्पा पार करत भारताने हे यश संपादन केलं. खरं तर साखळी फेरीतील भारताची स्थिती पाहून उपांत्य फेरी गाठेल की नाही अशी शंका होती. पण भारताचं गणित सुटलं आणि बाद फेरीत स्थान मिळालं. भारताने या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंकेविरूद्ध खेळला आणि विजयाने सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला लोळवलं. पण त्यानंतर भारताची विजयाची गाडी रूळावरून घसरली. दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. सलग तीन पराभवानंतर बाद फेरीचं गणित चुकलं होतं. पण न्यूजीलंडला पराभूत करत भारताने उपांत्य फेरीत जागा पक्की केली. तर साखळी फेरीतील बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारताला 1 गुण मिळाला. पण शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताला मोठा धक्का बसला. कारण फॉर्मात असलेली प्रतिका रावल या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाली होती. त्यामुळे तिला बाद फेरीच्या सामन्यांना मुकावं लागलं. उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघात शफाली वर्माची एन्ट्री झाली. ...
