चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार? गौतम गंभीरने स्पष्ट केलं की…
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. भारताचा अंतिम फेरीत सामना दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. दुसरीकडे, हा सामना कर्णधार रोहित शर्माच्या कारकिर्दीचा शेवट असेल, अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने आपलं मत मांडलं आहे.

टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खरं तर २६५ धावांचं खडतर आव्हान होतं. पण हे आव्हान भारताने सहज गाठलं. आता भारत अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाशी लढा करणार आहे. हा सामना ९ मार्चला होणार आहे. पण ९ मार्च रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असेल का? अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. रोहित शर्माचं वय आणि पुढील रणनिती पाहता बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. कारण भारतीय संघ २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. तिथपर्यंत रोहित शर्माची वनडे जागा राहील की नाही?याबाबतही शंका आहे. या सर्व प्रश्नांबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला प्रश्न विचारण्यात आला. दुबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला विचारलं गेलं की, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माचा प्लान काय आहे? त्याच्यात अजून किती क्रिकेट बाकी आहे?
प्रश्नांचा भडिमार सुरु झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘आता तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना समोर आहे. आता मी याबाबत काय बोलू? पण एक गोष्ट सांगू इच्छितो की, जर कर्णधार याच पद्धतीने फलंदाजी करत असेल तर तो ड्रेसिंग रुमसाठी मेसेज आहे. त्याच्यात अजून क्रिकेट बाकी आहे. रोहितने मोठी खेळी केली नाही पण चांगली खेळी केली आहे. आम्ही त्याच प्रभावाने खेळाडूंचं मूल्यमापन करतो.’ गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, तज्ज्ञ आणि पत्रकार धावा आणि सरासरी बघतात. पण आम्ही त्या खेळाडूने सामन्यात कशी छाप सोडली हे पाहतो. जर सर्व काही व्यवस्थित आहे तर त्याने काही फरक पडत नाही. आपण ज्या प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो त्यासाठी जर कर्णधार पहिला हात वर करत असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.
दुसरीकडे, बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे फॉर्मेटसाठी वेगळा विचार करत आहे. २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी ही रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीचा शेवटचा सामना असू शकतो. आता रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदानंतर निवृत्ती घेतो की पुढे खेळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या स्पर्धेनंतर टीम इंडिया थेट इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका जूनमध्ये होणार आहे. या मालिकेपूर्वी संघात काय उलथापालथ होते याकडे लक्ष लागून आहे.
