टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने फक्त 17 चेंडूत संपवला सामना, चार खेळाडू शून्यावर बाद
अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. ग्रुप ए मध्ये सलग दोन सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली आहे. वेस्ट इंडिजनंतर, मलेशियाला पराभवाची धूळ चारली आहे. या गटात भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

अंडर 19 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. भारत खेळत असलेल्या अ गटात श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि मलेशिया हे संघ आहेत. भारताने पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिज आणि मलेशियाला पराभूत केलं आहे. दुसरा टी20 सामना भारत आणि मलेशिया यांच्यात पार पडला. हा सामन्यात भारताने उल्लेखनीय कामगिरी केली. खरं तर या सामन्यात मलेशियाला डोकंच वर काढू दिलं आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांचा सामना करताना मलेशियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. चार फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. वैष्णवी शर्माने हॅटट्रीक घेत मलेशियाचं कंबरडं मोडलं. त्यामुळे मलेशियाला 14.3 षटकात सर्व गडी बाद 31 धावा करता आल्या. मलेशियाने भारतासमोर विजयासाठी 32 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हा भारताने अवघ्या 17 चेंडूत पूर्ण केलं. गोंगडी त्रिशा आणि जी कमलिनी जोडीने हे आव्हान पूर्ण केलं.
पहिल्या षटकात भारताच्या खात्यात 3 धावा आल्या. पण दुसऱ्या षटकात गोंगडी त्रिशाने आक्रमक पवित्रा घेतला. या षटकात तीन चौकारांसह 15 धावा ठोकल्या. हाच आक्रमक पवित्रा तिसऱ्या षटकातही कायम ठेवला. या षटकातील 5 चेंडूत 14 धावा ठेकल्या. गोगंडीने या षटकात तीन चौकार मारले. यासह हा सामना फक्त 17 चेंडूतच संपला. गोंगडी त्रिशाने 12 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या. तर जी कमालिनीने 5 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नाबाद 4 धावा केल्या. या सामन्यात गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैष्णवी शर्माला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मलेशिया महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): नूर आलिया हेरुन (विकेटकीपर), नुनी फारिनी सफारी, हुस्ना, नूर दानिया स्युहादा (कर्णधार), नूर इज्जातुल स्याफिका, नुरीमन हिदाय, सुआबिका मनिवन्नन, नूर ऐन बिंती रोस्लान, नूर इस्मा दानिया, सिती नाजवा, मार्स्या किस्टिना अब्दुल्ला.
भारत महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): गोंगडी त्रिशा, जी कमलिनी (विकेटकीपर), सानिका चाळके, निकी प्रसाद (कर्णधार), भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम मो. शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा.
