WPL 2026 : दीप्ती शर्माला युपी वॉरियर्सने का रिटेन केलं नाही? प्रशिक्षकाने सांगितलं या मागचं कारण
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेची जय्यत तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पण युपी वॉरियर्सने वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेल्या दीप्ती शर्माला रिटेन केलं नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण असं का ते प्रशिक्षकांनी सांगितलं.

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. भारतीय महिला क्रिकेट संघाचं हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं मोठं यश आहे. यापूर्वी भारतीय संघाला कधीच आयसीसी जेतेपद मिळालं नव्हतं. त्यामुळे भारतीय क्रिकेटला प्रोत्साहन मिळणार आहे. असं असताना दुसरीकडे, वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे वेध लागले आहेत. पाचही फ्रेंचायझींनी मेगा लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्स पाच पैकी पाच खेळाडू रिटेन केले आहे. त्यामुळे राईट टू मॅचचं कार्डही वापरता येणार नाही. दुसरीकडे, युपी वॉरियर्सने फक्त एकच अनकॅप्ड प्लेयर रिटेन केला असून बाकी खेळाडूंना रिलीज केलं आहे. या यादीत अष्टपैलू आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माचं नाव आहे. युपी वॉरियर्सचे हेड कोच अभिषेक नायर यांचं याबाबत वक्तव्य समोर आलं आहे.
युपी वॉरियर्सचे हेड कोच अभिषेक नायरने फ्रेंचायझीकडून घेतलेल्या निर्णयाबाबत सांगितलं की, रिटेन्शनबाबत निर्णय घेणं कायम कठीण असतं. कारण तुम्हाला चांगले खेळाडू सोडावे लागतात. पण माझ्या मते फ्रेंचायझीने असा निर्णय घेण्याचं कारण असं की चांगल्या पर्ससह मेगा लिलावात उतरू इच्छित आहे. हातात पैसे असले की याच खेळाडूंना पुन्हा संघात घेण्याची संधी असते. तसेच इतर मोठ्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी पैसे असतात. आमच्याकडे आरटीएम सुविधा असेल. आम्हाला असा संघ बनवायचा आहे की जो चॅम्पियनशिप मिळवून देईल. त्यामुळे हा निर्णय योग्य की अयोग्य असा काही विचार नाही.
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेसाठी युपी वॉरियर्स सघाने फक्त एकच खेळाडू रिटेन केला आहे. श्वेता सहरावतला संघात 50 लाख देऊन कायम ठेवलं आहे. त्यातही श्वेता अनकॅप्ड प्लेयर आहे. त्यामुळे युपी वॉरियर्सकडे चार पर्याय आहेत. त्यात दोन विदेशी आणि दोन भारतीय कॅप्ड प्लेयर संघात घेऊ शकतात. युपी वॉरियर्सकडे 14 कोटी 50 लाख रुपये आहे. त्यामुळे संघ बांधणी करताना मोठी रक्कम मोजता येईल. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मेगा लिलाव 27 नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे.
