WTC 2027: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत मोठा बदल होणार, या तीन संघाचा समावेश होणार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं चौथं पर्व सुरु असून आतापर्यंत नऊ संघ यात भाग घेत आहेत. पण पाचव्या पर्वात संघांची संख्या नऊ वरून 12 होणार असल्याची माहिती मिळत आहे. या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलली जात आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु झाल्यापासून कसोटी क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. कारण जेतेपदासाठी वाढलेली चुरस आणि गुणांचं गणित सोडवण्यासाठी होणारी धडपड उत्सुकता वाढवणारी आहे. आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात तीन नवे विजेते मिळाले. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने, दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या पर्वात दक्षिण अफ्रिकेने जेतेपदावर नाव कोरलं. आता चौथ्या पर्वात कोण विजेता ठरणार याची उत्सुकता आहे. यासाठी दोन वर्षांची सायकल सुरु झाली असून गुणतालिकेत प्रत्येक सामन्यानंतर उलथापालथ होताना दिसत आहे. या स्पर्धेत एकूण 9 संघांचा सहभाग आहे. पण आता ही संख्या नऊ वरून 12 करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. इतकंच काय तर प्रत्येक संघाला निश्चित संख्येत कसोटी सामने खेळावे लागतील. आता सुरू असलेल्या पर्वात कधी पाच सामन्यांची कसोटी मालिका, तर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाते. त्यामुळे विजयी टक्केवारीवर फरक दिसून येतो.
अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंडसारख्या नव्या कसोटी संघांना सलग खेळण्याची संधी मिळेल. 12 संघ 2027-2029 या कालावधीपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळतील. एका बोर्ड डायरेक्टरने ईएसपीएनक्रिकइन्फो सांगितलं की, ‘आता प्रत्येक देशाला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. जे संघ हा फॉर्मेटला पुढे चालना देऊ इच्छितात त्यांना प्रोत्साहनही मिळेल.’ दुसरीकडे, कोणत्याही क्रिकेट मंडळाला कसोटी सामन्यांचं आयोजन करताना अतिरिक्त निधी मिळणार नाही हे स्पष्ट केलं आहे. आता ही स्पर्धा रॉबिन राउंड पद्धतीने होणार की दोन गट पडणार याबाबत चर्चा रंगली होती. 12 संघांचा विचार केला तर प्रत्येक संघाला किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागणार, अशी चर्चा आहे. यामुळे मालिकेचा निकाल लागेल आणि गुणतालिकेतही उलथापालथ होईल.
गेल्या वर्षभरापासून, आयसीसी आणि क्रिकेट बोर्डांमध्ये द्विस्तरीय प्रणाली आणि रेलीगेशन-प्रमोशन मॉडेलबाबत चर्चा सुरू होती. पण आयसीसी तिमाही बैठकीत ही योजना मागे घेण्यात आली. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाच्या विरोधामुळे पदोन्नती-रेलीगेशन मॉडेलवर एकमत होऊ शकले नाही. यांच्यापैकी कोणत्याही संघाला खालच्या विभागात हलवले गेले तर ते एकमेकांविरुद्ध खेळण्याच्या संधी गमावतील, अशी भीती होती. त्यामुळे या संघांनी या मॉडेलला विरोध केला.
